पटणा – माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूवर बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. जीतनराम मांझी यांच्या HAM पक्षाने या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
HAM चे प्रवक्ते डॉ. दानिश रिजवान यांनी या प्रकरणात एलजीपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर संशय घेतला आहे. संपूर्ण देशाला माहिती झालं पाहिजे की, चिराग पासवान हे रामविलास पासवान यांच्याशी निगडीत कोणते रहस्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्वांना माहिती झाले पाहिजे. रामविलास पासवान यांच्या मृत्यूशी निगडीत अनेक प्रश्न आहेत ज्यामुळे चिराग पासवान यांच्याभोवती संशय निर्माण होत असल्याचा दावा रिजवान यांनी केला आहे.
हिंदुस्तान अवाम मोर्चाचे डॉ. दानिश रिजवान यांच्या नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, देशातील दलितांचे मोठे नेते आणि तुमच्या मंत्रिमंडळातील सहकारी रामविलास पासवान हे काही दिवसांपूर्वी आपल्याला सोडून गेले, त्यांच्या निधनानं अनेकांना धक्का बसला, शोककळा पसरली, आजही त्यांच्या आठवणीने आमचं मन गहिवरुन जाते. परंतु दुसरीकडे लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान हे रामविलासजींच्या अंत्यसंस्काराच्या दुसऱ्याच दिवशी व्हिडीओ शूटींग करताना दिसतात. या व्हिडीओत ते हसताना, वारंवार रिटेक घेताना दिसत होते त्यामुळे त्यांच्या या वागणुकीवर प्रश्न निर्माण होत आहेत.
तसेच रामविलास पासवान यांच्या निधनाशी निगडीत अनेक प्रश्न आहेत, ज्यामुळे चिराग पासवान यांच्याबद्दल संशय निर्माण होतो, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल होते, तेव्हा कोणाच्या सांगण्यावरुन हॉस्पिटल प्रशासनाला मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करण्यापासून रोखलं गेलं? रामविलास पासवान यांना हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी फक्त ३ लोकांना परवानगी होते, त्यांना भेटूही दिलं नाही असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मिळणं गरजेचे आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि सत्य जनतेसमोर यावं अशी मागणी दानिश रिजवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रात केली आहे.
वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिराग पासवान यांची प्रॅक्टिस; "तो" Video व्हायरल
चिराग पासवानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी वडिलांना श्रद्धांजली वाहणारा चिराग पासवान यांचा प्रॅक्टिस करतानाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. चिराग पासवान नाटक करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने हल्लाबोल केला. व्हिडीओमध्ये चिराग हे रामविलास पासवान यांच्या फोटो समोर उभे राहून भाषणाची तयारी करत होते. चिराग यांच्या आजुबाजूला कॅमेरामन आणि इतर काही लोकं होती. त्यांना ते काही सूचना करत होते. काही ओळी म्हटल्यानंतर ते पुढे काय म्हणायचं ते विसरले आणि पुन्हा शूट करण्यास सांगू लागले.