पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत विजयाने हुलकावणी दिल्यानंतर महाआघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेवरून काँग्रेस आणि आरजेडीमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. तिवारी यांच्या टीकेमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आरजेडीला आघाडीचा धर्म पाळण्याचा सल्ला दिला आहे.शिवानंद तिवारी यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते प्रेम चंद्र मिश्रा म्हणाले की, तेजस्वी यादव यांनी आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांना लगाम लावावा. ते काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींबाबत गिरिराज सिंह आणि शाहनवाझ हुसेन यांच्यासारखी भाषा बोलत आहेत. ही बाब आम्हाला मान्य नाही. आघाडीचा धर्म असतो आणि त्याचे प्रत्येक पक्षाने पालन करावे.बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या मुद्द्यावरून आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवर अनेक आरोप केले होते. बिहार विधानसभेची निवडणूक ऐन रंगात आली असताना राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सिमलामधील निवासस्थानी सहलीसाठी गेले होते. अशाप्रकारे पक्ष चालतो का? सध्या ज्या प्रकारे काँग्रेस चालवली जात आहे त्याचा फायदा भाजपाला होत आहे, असा आरोपही तिवारी यांनी केला. महाआघाडीसाठी काँग्रेस ही बेडी बनली आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीत .राहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती, असेही शिवानंद तिवारी म्हणाले होते.दरम्यान, शिवानंद तिवारी यांच्या टीकेनंतर भाजपाचे नेते गिरिराज सिंह यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. बिहारमधील महाआघाडीचा घटक पक्ष असलेल्या आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी सांगितले की राहुल गांधी नॉन सिरियस पर्यटक नेते आहेत. शिवानंद तिवारी राहुल गांधी यांना ओबामांपेक्षा अधिक ओळखू लागले आहेत. मग काँग्रेस अजूनही गप्प का? असा चिमटा त्यांनी काढला होता.