लखनौ – मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार बुधवारी दिल्लीत पार पडला. तब्बल ४३ नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तारात नव्या नेत्यांना संधी देण्याबरोबरच मोदींनी काही दिग्गज नेत्यांचे राजीनामेही घेतल्याने अनेकांना धक्का बसला. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन यांच्यासह १२ मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. नव्या मंत्रिमंडळात उत्तर प्रदेशच्या ७ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मोदी सरकारच्या कॅबिनेट विस्ताराकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. यात उत्तर प्रदेशातील अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली. परंतु निषाद पार्टीच्या हाती काहीच लागलं नाही. त्यामुळे भाजपाचा घटक पक्ष असलेली निषाद पार्टी नाराज झाली आहे. संजय निषाद यांनी थेट मोदी सरकारला दगाबाज सरकार म्हणून उल्लेख केला. “दगाबाज सरकार का दर्द दिल मे है और दिल मुश्किल मै है” अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारच्या कॅबिनेट विस्तारावर भाष्य केले आहे. निषाद पार्टीचे संस्थापक संजय निषाद यांनी त्यांचा मुलगा खासदार प्रविण निषादला केंद्रीय मंत्रिमंडळात न घेतल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे.
संजय निषाद म्हणाले की, अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होतो मग प्रविण निषादचा का नाही? निषाद समुदायाचे लोक याआधीच भाजपापासून दूर जात आहेत. जर पक्षाने त्यांची चूक सुधारली नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम पाहायला मिळतील असा इशारा त्यांनी भाजपाला दिला आहे. प्रविण निषाद यांचा कॅबिनेटमध्ये समावेश नसल्याने निषाद समाजाची फसवणूक झाली आहे. १८ टक्के निषाद समाजाचा पुन्हा विश्वासघात झाला आहे. तर ४-५ टक्क्यावाल्यांना मंत्रिपद मिळालं असा आरोप त्यांनी केला.
संजय निषाद यांचे पुत्र खासदार प्रविण हे कबीर नगरमधून लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. २०१७ मध्ये प्रविणने गोरखपूर पोटनिवडणुकीत सपा उमेदवार म्हणून विजय मिळवला होता. अनुप्रिया पटेल यांच्यावर निशाणा साधत निषाद पार्टीचे अध्यक्ष संजय निषाद म्हणाले की, जे लोक स्वत:ची जागा जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणुकीत जिंकवू शकत नाहीत. ज्या लोकांनी भाजपाचा पराभव करण्यासाठी काम केले अशांना मंत्रिपद दिलं. निषाद समाजाने एकगठ्ठा मतं देऊन उत्तर प्रदेश आणि केंद्रात भाजपाचं सरकार बनवलं असं संजय निषाद म्हणाले.
त्याचसोबत सध्या आम्ही भाजपासोबत आहोत परंतु भाजपाने आमच्याकडे दुर्लक्ष केल्याने आगामी काळात आम्ही आमच्या रणनीतीवर विचार करू. भाजपासोबत आघाडी करायची काही नाही हे ठरवू असं संजय निषाद म्हणाले. २०१७ च्या गोरखपूर पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाने संजय निषाद यांचे पुत्र प्रविण निषादला मैदानात उतरवलं. त्यांच्यासमोर भाजपाचे उपेंद्र दत्त शुक्ला उभे होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर गडात प्रविण निषादने विजय मिळवला. त्यानंतर ते चर्चेत आले. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी प्रविण निषाद यांनी भाजपात प्रवेश घेतला. त्यानंतर भाजपाने प्रविण निषाद यांना संत कबीर नगर लोकसभा जागेवरून तिकीट दिलं. या निवडणुकीत प्रविण निषाद जिंकले. प्रविण निषाद भाजपाचे खासदार आहेत. जर त्यांनी पक्ष सोडला तर त्यांची खासदारकी धोक्यात येऊ शकते. त्याचमुळे संजय निषाद भाजपासोबत दिसत आहेत.