'पार्थ'वरून पवार कुटुंबात रंगलेल्या वादावर अखेर पडदा, असे झाले मनोमिलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 07:55 PM2020-08-16T19:55:43+5:302020-08-16T19:57:02+5:30
आज बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांची एकत्र बैठक झाली. या बैठकीत गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार आणि पार्थ पवार या आजोबा नातवामध्ये झालेल्या वादावर पडदा पडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
बारामती - पार्थ पवार यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाऊन केलेली काही विधाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर दिलेल्या संतप्त प्रतिक्रियेनंतर पवार कुटुंबामध्ये निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. आज बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांची एकत्र बैठक झाली. या बैठकीत गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार आणि पार्थ पवार या आजोबा नातवामध्ये झालेल्या वादावर पडदा पडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
याबाबत सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार या प्रकाराबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर हा संपूर्ण वाद निवळल्याने शरद पवार हे पुण्याहून मुंबईला रवाना झाले. तर कुटुंबातील बैठक आवरून अजित पवार हे बारामतीहून पुण्यास रवाना झाले. दरम्यान, अजित पवार हे आता मुंईला येणार असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्याने नाराज असणारे पार्थ पवार कुटुंबातील नातेवाईकांची भेट घेत होते. यामध्ये पार्थ यांची काका श्रीनिवास पवार यांच्या 'अनंतारा ' निवासस्थानी बैठक झाली. यामध्ये पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याची चर्चा आहे .या चर्चेबाबत' लोकमत'शी बोलताना पार्थ यांच्या काकू शर्मिला पवार यांनी सांगितले की सगळं व्यवस्थित असल्याचं वक्तव्य केलं होतं .
कणन्हेरी येथे पार पडलेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, श्रीनिवास पवार, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची उपस्थिती होती. यामध्ये पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याची चर्चा आहे. पार्थ पवार शनिवारी त्यांचे काका श्रीनिवास यांच्या निवासस्थानी दुपारी साडेतीन वाजता आले होते. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार नसल्याची माहिती मिळाली होती. मात्र, काल रात्री साडेसात वाजता अचानक अजितदादा या ठिकाणी पोहचले. या वेळी पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.