सुशांतसिंह प्रकरणाला वर्ष होऊनही सीबीआयचे सोयीस्कर मौन - काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 10:22 AM2021-08-06T10:22:45+5:302021-08-06T10:23:30+5:30
Sushant Singh Rajput: चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला एक वर्ष पूर्ण झाले असून, अद्याप सीबीआय कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. त्याच्यामागे कोणाचा दबाव तर नाही ना?
मुंबई : चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला एक वर्ष पूर्ण झाले असून, अद्याप सीबीआय कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. त्याच्यामागे कोणाचा दबाव तर नाही ना? महाराष्ट्रातील तपास जाणीवपूर्वक अंतहीन ठेवण्याचे मोदी सरकारचे आदेश आहेत का? हे सीबीआयने तत्काळ स्पष्ट करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सावंत म्हणाले, सीबीआयने बिहार पोलिसांकडून सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूची चौकशी हाती घेण्याला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. बिहार पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १७७ कलमाचे उल्लंघन केले होते. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलिसांच्या एकूण तपासाबद्दल समाधान व्यक्त केले होते. परंतु मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा आणि मविआ सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा राजकीय डाव होता. बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा याकरिता वापर केला गेला. भाजपने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन खुलेआमपणे खून, बलात्काराचे आरोप केले व बिहार निवडणुकीतही सुशांतच्या मृत्यूचा वापर केला.
मविआ सरकारवरील सुनियोजित राजकीय हल्ल्याची रणनीती आखून भाजप संचलित वाहिन्यांना सुशांतसिंहचा खून झाल्याचा सातत्याने उच्चार करण्यास सांगितले गेले. भाजप नेते महाराष्ट्राची बदनामी करत होते. सीबीआय आणि इतर एजन्सींनी बनावट माहिती लीक केली, असे ते म्हणाले.
जनतेची माफी मागितली पाहिजे
भाजप आयटी सेलने हजारो बनावट ट्विटर, फेसबुक आणि यूट्युब अकाउंट तयार केले व त्या माध्यमातून अपप्रचार केला. भाजपने या प्रकरणात महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली त्याबद्दल जनतेची माफी मागितली पाहिजे, असेही सावंत म्हणाले.