मुंबई – राज्यात कोरोनाचा वाढता कहर पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी काही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. संपूर्ण देश कोरोना महामारीला तोंड देत असताना महाराष्ट्रातील स्थिती सर्वात बिकट आहे. महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. (MNS Raj Thackeray letter to PM Narendra Modi over Corona situation of Maharashtra)
राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलंय की, देशातील पहिल्या काही रुग्णांमध्ये काही महाराष्ट्रात आढळले होते. तेव्हापासून राज्यात निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवाने सर्वाधिक मृत्यूदेखील झाले आहेत. कोरोना महामारीची पहिली लाट आणि लॉकडाऊन यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद देशभरात पडलेले अजूनही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, लॉकडाऊन जाहीर करणे हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर तुम्हाला पुरेशा लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
तसेच या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर १०० टक्के लसीकरण करण्याची रणनिती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून सर्व वयोगटातील १०० टक्के लसीकरण लवकरात लवकर करायलं हवंय. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी महाराष्ट्राला केंद्राची साथ हवी असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंनी केंद्र सरकारकडे केलेल्या मागण्या
- महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्याव्या
- राज्यातील खासगी संस्थानांही लसी खरेदी करता याव्यात
- सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी
- लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी
- कोविड १९ रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, उदा. रेमडेसिविर, ऑक्सिजन याचा पुरेसा साठा राज्यात असावा यासाठी राज्याला आवश्यक पाऊलं उचलण्यासाठी मोकळीक द्यावी
कोविड १९ च्या साथीमुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहेत. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. आरोग्य हा विषय राज्यांचा आहे म्हणून केंद्राने राज्याला केवळ परवानगीच नाही तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील. ज्यातून एकमेकांना शिकण्याची संधीही मिळेल. या सूचनांकडे सकारात्मक दृष्टीने पाहाल आणि प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा नव्हे तर खात्रीच आहे असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रात व्यक्त केला आहे.