नवी दिल्ली – देशभरात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोनाची लस घेतली, ही लस टोचताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नर्सला जे सांगितलं त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्यांमध्ये हशा पिकला, नेते मोठ्या कातडीचे असतात, त्यांना मोठी सुई टोचा असं पंतप्रधानांनी गंमतीने नर्सला म्हटलं, पुडुचेरी येथील नर्स पी. निवेदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लसीचा पहिला डोस दिला.(PM Narendra Modi Comment Made Nurses Laugh on corona Vaccination)
सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्स येथे पोहचले, त्यावेळी तेथील स्टाफ नर्सच्या चेहऱ्यावर थोडी चिंता जाणवून येत होती, त्यामुळे वातावरण थोडं गंमतीदार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नर्सला त्यांचं नाव विचारलं, त्यानंतर तुम्ही कुठून आला आहात? अशी विचारपूस केली, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हसत हसत नर्सला विचारलं की तुम्ही जनावरांसाठी वापरण्यात येणाऱ्या सुईचा वापर करणार आहात का? मोदींच्या या प्रश्नावर नर्स एकमेकांकडे पाहत राहिल्या. त्यांना काहीच समजलं नाही.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, राजकीय नेत्यांची कातडी फार मोठी असते, त्यासाठी त्यांना विशेष मोठ्या सुईचा वापर करावा लागेल, मोदींच्या या विधानावर सर्व नर्समध्ये हशा पिकला, पंतप्रधान मोदींना कोरोनाची लस दिल्यानंतर त्यांनी सांगितलं मला लस दिली त्याची जाणीवही झाली नाही, लसीकरणावेळी पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर हास्य होतं,
देशभरात कोरोना लसीकरण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे, यात सामान्य जनतेला लस दिली जाणार आहे, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समोर येऊन लस टोचून घेतली, सोमवारी सकाळी लवकर ते दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये पोहचले, त्यामुळे मोकळ्या रस्त्यावरून जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यासाठी ना कोणतीही वाहतूक थांबवावी लागली, ना कोणतेही बदल करावे लागले, एम्समध्ये लवकर पोहचून त्यांनी कोरोना लस घेऊन लोकांमध्ये लसीकरणाबाबत विश्वास निर्माण केला.
पी निवेदा या मूळच्या पुडुचेरीच्या रहिवासी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लस देताना त्यांच्यासोबत केरळच्या मूळ रहिवासी असलेल्या परिचारीका रोसम्मा अनिल यादेखील होत्या. यावेळी त्यांच्यासोबत एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधानांनी लस घेतल्यानंतर सर्व प्रोटोकॉलचं पालन केलं आणि अर्धा तास त्या ठिकाणी थांबलेही होते.