मुंबई – १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस दिली जाणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी ट्विट करून दिली होती. मात्र काही वेळातच आदित्य ठाकरे यांनी ट्विट डिलीट केल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे. लस पुरवठा करणे सध्या सरकारची सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. राज्यातील नागरिकांचे कोरोनापासून रक्षण करणे राज्य सरकारचं प्राधान्य आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.(Aditya Thackeray deleted tweet about free vaccination for people above 18)
त्यानंतर काही वेळात आदित्य ठाकरेंनी ट्विट डिलीट करून राज्याच्या अधिकृत लसीकरण धोरणाबाबत कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी मी ट्विट डिलीट करत आहे. राज्यात लसीकरणाची मोहिम सर्वसमावेशक, जलद असेल. याबाबत लसीकरणाच्या अधिकृत धोरणाबाबत लवकरच नागरिकांना कळवण्यात येईल असं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे नागरिकांना मोफत लस मिळणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
आदित्य ठाकरेंना भाजपाचा टोला
बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, वाटाघाटी आणि टक्केवारीमुळे लोकहितासाठी जाहिर केलेला संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये , हीच अपेक्षा असा टोला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.
नवाब मलिकांची घोषणा
राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी दिली आहे. केंद्र सरकारने १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ४५च्या खालील लोकांना केंद्र सरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान कोविशील्ड केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खासगींना ६०० रुपये किंमतीत मिळणार आहे