नवी दिल्ली – संपूर्ण देशात सध्या कोरोना महामारीमुळं अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. दिवसाला लाखो लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. बुधवारी ३ लाखांहून अधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळले. ही आतापर्यंतची विक्रमी नोंद आहे. कोरोना इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला असून पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहतंय यावरून भाजपा प्रवक्त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगल्याच भडकल्याचं दिसून आलं.
देशात कोरोनाचा स्फोट होत असताना पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मोठ्या गर्दीच्या सभा होत आहेत. यावरून भाजपा प्रवक्त्यांनी एका चॅनेलच्या डिबेट शोवेळी स्वत:च्या पक्षालाच टार्गेट केले. भाजपा प्रवक्त्या रितू रावत म्हणाल्या की, सुरक्षित अंतर ठेवा, घरात राहा. असं तुम्ही सांगत होता मग निवडणुका का घेतल्या? तुम्हीच हे पाळलं नाही. गंगास्नान का करायला दिलं? ऑक्सिजन नसल्याने अनेकांचे जीव जातायेत. या पृथ्वीवर माणसं शिल्लक नसली तर निवडणुकीचा काय फायदा? सरकार बनवलं जाईल, निवडणुका होतील पण त्यासाठी एक वेळ द्या. मला भाजपा प्रवक्ते पदावरून काढलं तरी चालेल पण लोकं मरतायेत, औषधांची किंमत वाढतेय, मला याचा त्रास होतोय असं त्यांनी सांगितले.
काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?
आपल्या लहानग्यांनी घरातील मोठ्या माणसांना स्वच्छता, अनुशासन यांचे महत्त्व पटवून दिले होते. घरातील मोठ्या माणसांनी बाहेर जाऊ नये, असा हट्ट धरला होता. पाचवी, आठवी, दहावीत असणाऱ्यांना परिस्थितीविषयीचे गांभीर्य जाणतेपणाने दाखवले होते. तेच आताही अपेक्षित आहे. बालमित्रांनी कोरोनाचे गांभीर्य पुन्हा एकदा पटवून द्यावे. घरात असे वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण, विनाकाम घराबाहेर पडता कामा नये. हा तुमचा बालहट्ट मोठे काम करू शकतो, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहानग्यांना आवाहन केले.
कोरोनाने सर्वच रेकॉर्ड मोडले
देशात कोरोनाचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या २४ तासांत तब्बल ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.