इंदौर – कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जगातील प्रत्येक देश याविरुद्ध आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. जगात या महामारी हाहाकार माजवला आहे. भारतातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. कोरोना रोखण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. याच दरम्यान अनेक राजकीय नेते कोरोना नियंत्रणात आणण्यावरून अजबगजब उपाय सांगत असल्याचं दिसून आलं आहे.
यूपीतील एका भाजपा नेत्याने अलीकडेच गोमूत्र प्यायल्याने कोरोना ठीक होतो असं विधान केले होते. त्यानंतर आता मध्य प्रदेशात वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत असणाऱ्या मंत्री उषा ठाकूर यांनी अनोखा सल्ला दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर सर्व लोकांनी सकाळी १० वाजता यज्ञ करायला हवा असं उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या विधानावर चर्चा होऊ लागली आहे.
मध्य प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राजधानी भोपाळसह अन्य शहरात शेकडो मृत्यू झाले आहेत. भोपाळमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूनंतर चितेचे फोटो देश आणि जगात व्हायरल झाले होते. आता शिवराज चौहान सरकार राज्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी आधीच तयारी करत आहे त्यात पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी सांगितलं की, देशात कोरोना महामारीची तिसरी लाट थांबवायची असेल तर लोकांनी यज्ञ करायला हवा. भारताची सनातन आणि पौराणिक परंपरेचा हवाला देत ठाकूर यांनी यज्ञ करण्याची वेळही निश्चित केली.
मंत्री उषा ठाकूर यांनी सांगितले की, यज्ञ केला तर कोरोनाची तिसरी लाट भारताला स्पर्शही करू शकत नाही. कोरोनाची तिसरी लाट नियंत्रित करण्यासाठी सरकार सर्व तयारी करत आहे. सर्वांचे प्रयत्न यशस्वी होतील. सर्व लोकांनीही पर्यावरण शुद्ध करण्यासाठी यज्ञ करावा. आता १०, ११, १२ आणि १३ या तारखेला सकाळी १० वाजता यज्ञ करावा. यज्ञ हे वैद्यकीय आहे हे कर्मकांड अथवा अंधविश्वास नाही. तर पर्यावरण शुद्ध करण्याची वैद्यकीय प्रक्रिया आहे असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, उषा ठाकूर यांनी पहिल्यांदा असं विधान केले आहे असे नाही. तर याआधीही मास्कवरून केलेल्या विधानावरून त्या चर्चेत आल्या होत्या. मास्कचा वापर करण्यावरून उषा ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सांगितलं होतं की, मी रोज योगा करते, प्राणायम करते आणि सप्तशक्ती पाठ करते त्यामुळे मला कोरोना होऊ शकत नाही असाही दावा त्यांनी केला होता.