मुंबई – राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ८ जूनपासून सरकारने अनलॉक १ सुरु करुन पुन्हा एकदा जनजीवन पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने दुकानं, हॉटेल्स उघडली आहेत पण राज्यातील सलून पार्लर बंद असल्याने नाभिक समाजावर अन्याय होत आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोज टापटीप राहतात, ते नेमकं कुठे दाढी केस कापतात हा प्रश्नच आहे असा खोचक टोला भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी लगावला आहे.
अनलॉक १ मध्ये अनेक निर्बंध शिथिल केले असताना सलून बंद ठेवण्यात आले आहेत, नाभिक समाजावर एवढे मोठे बंधन घालण्याचं कारण नाही. हा अन्याय दूर करुन सरकारने त्यांना नियम व अटी घालून परवानगी द्यावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी राज्य सरकारकडे केली आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने शिथिलता आणण्यात सुरुवात झाली आहे. मग नाभिक समाजालाही कोविड १९ चे नियम सांभाळून त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी असं ते म्हणाले.
तर कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालं आहे, राज्य सरकारने तात्पुरती जी मदत दिली ती तोकडी आहे. कोकणावर शिवसेनेने कायम प्रेम केले, त्यामुळे किमान ५०० कोटी रत्नागिरीला, ८०० कोटी रायगडला तर सिंधुदुर्गाला १०० कोटींची मदत करण्यात यावी, ज्या कोकणातील माणसांनी तुमच्यावर भरभरुन प्रेम केले त्यांच्यावर मेहेरबानी करा, मच्छिमारांसाठी वेगळं पॅकेज जाहीर करावी अशा विविध मागण्या आमदार प्रसाद लाड यांनी राज्य सरकारकडे केली.
दरम्यान, मच्छिमार करणारे कोळी समाज हा मुंबईचा आत्मा आहे, त्यांना उभारी देण्यासाठी प्रयत्न करा, शैक्षणिक, पर्यटन व्यवसायासाठी मदत करावी, याबाबत मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र देण्यात आलं आहे. कोविड १९ ची लॅब रत्नागिरीत व्हावी अशी मागणी आम्ही केली, त्यानंतर ३ महिन्यांनी सरकारला जाग आली, जर या सरकारने आमची भूमिका मान्य केली नाही तर जनतेसाठी, कोकणासाठी आम्ही राज्य सरकारशी दोन हात करण्याचीही तयारी केली आहे असा इशारा भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला.
आजच्या महत्त्वाच्या बातम्या
भारताबाबत खरा ठरतोय ‘या’ वैज्ञानिकाचा दावा; जुलैपर्यंत २१ लाख कोरोना रुग्ण होणार?
...म्हणून भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईला दिल्लीच्या रुग्णालयात केलं दाखल
कोरोनाची वाढती संख्या पाहता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राची नवी गाईडलाईन, काय आहेत नियम?