Coronavirus: गरीब, गरजूंना केंद्राने थेट बँकेत पैसे पाठवावेत; काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 05:29 AM2021-05-17T05:29:42+5:302021-05-17T05:30:28+5:30
यामुळे दशलक्षावधी लोकांच्या यातनांवर फुंकरच बसेल, असे नाही, तर आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीनेही ते चांगले असेल. कारण त्याचे अर्थव्यवस्थेवर अनेक अंगांनी परिणाम होतील, असेही अधिर रंजन चौधरी यांनी या पत्रात म्हटले.
नवी दिल्ली : सध्या कोरोना महामारीमुळे वेगवेगळ्या राज्यांत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गरीब, रोजंदारीवर काम करणारे आणि कमकुवत घटक देत असलेल्या अत्यंत कठीण परिस्थितीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. महामारी आणि लॉकडाऊनमुळे या लोकांचे रोजगार गेले. उत्पन्न घटले. पर्यायाने त्यांच्यासमोर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे काँग्रेसचे लोकसभेतील नेते आणि लोक लेखा समितीचे अध्यक्ष अधिर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी लिहिलेल्या पत्रात म्हटले.
वेगवेगळ्या राज्यांतील गरीब आणि गरजूंना सध्याच्या लॉकडाऊन दिवसांत थेट रोख पैसे पाठविण्याचा चौधरी यांच्या या पत्राचा विषय आहे. चौधरी त्यात म्हणतात की, “प्रतिकूल परिस्थितीमुळे या लोकांची परिस्थिती शोचनीय बनली असून, ते स्वत:ला पूर्णपणे निराधार आणि कोणतीही आशा शिल्लक राहिलेली नाही, असे समजत आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षांनी गरजूंना विनामूल्य धान्य आणि रोजगार नसलेल्या सर्वांना दरमहा सहा हजार रुपये द्यावेत, अशी सूचना केलीआहे.” सध्याच्या महामारीत गरीब आणि शोषित वर्गाची परिस्थिती विचारात घेता, सुरुवात म्हणून केंद्र सरकारने लॉकडाऊन असलेल्या सर्व राज्यांत (पश्चिम बंगालसह) सगळ्या पात्र लोकांना दरमहा सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात पाठविण्याच्या काँग्रेस अध्यक्षांच्या सूचनेवर आपण गांभीर्याने विचार करावा, अशी मी आपणाला
विनंती करीन. यामुळे दशलक्षावधी लोकांच्या यातनांवर फुंकरच बसेल, असे नाही, तर आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीनेही ते चांगले असेल.
कारण त्याचे अर्थव्यवस्थेवर अनेक अंगांनी परिणाम होतील, असेही अधिर रंजन चौधरी यांनी या पत्रात म्हटले.