रायपूर - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र देशात कोरोनाचा प्रकोप, लसींची आणि अन्य औषधांची टंचाई सुरू असताना केंद्र सरकारने सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम सुरू ठेवले आहे. (Coronavirus in India) पण कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड राज्य सरकारने मात्र नवे राजभवन आणि नव्या मुख्यमंत्री निवासस्थानाचे बांधकाम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. (Chhattisgarh government suspends all constructions from Raj Bhavan to CM's residence) छत्तीसगड सरकारने नवीन रायपूर येथे बांधकाम सुरू असलेले नवे राजभवन, मुख्यमंत्री निवास, मंत्री आणि अधिकाऱ्यांची निवासस्थाने, सर्किट हाऊस यांच्यासह सर्व मोठ्या बांधकामांच्या कामाला स्थगिती दिली आहे. तसेच नवीन रायपूर येथे प्रस्तावित असलेल्या नव्या विधानसभा भवनासाठी जारी करण्यात आलेले टेंडरही रद्द करण्यात आले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, आमच्यासाठी आमची जनता हे प्राधान्य आहे. कोरोना येण्यापूर्वी राज्यातील या कामांचे भूमीपूजन झाले होते. मात्र आज संकटकाळात या सर्व बांधकामांच्या कामाला स्थगिती देण्यात येत आहे.
दरम्यान, मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मात्र या निर्णयावर टीका केली आहे. हा निर्णय दोन पावले पुढे जाऊन चार पावले मागे येण्यासारखा असल्याचा टोला भाजपाने लगावला आहे. मात्र काँग्रेसकडूनही या निर्णयावरून भाजपाला सवाल विचारण्यात येत आहे. छत्तीसगडमधील काँग्रेसचे प्रवक्ते आर.पी. सिंह यांनी माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांना टॅग करून आता सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पालाही स्थगिती मिळणार का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.