मुंबई - पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने १ मे पासून सुरू होणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ( Corona Vaccination) महाराष्ट्रातही लसींच्या टंचाईमुळे १ मेपासून लगेच लसीकरण होणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आधीच स्पष्ट केले होते. दरम्यान, कोरोना लसीकरणावरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या राज्यातील भाजपा नेत्यांना काँग्रेसने जोरदार टोला लगावला आहे. लसीकरणावरून भाजपा नेत्यांची राज्य सरकारवरील टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. (Congress Spock person Sachin Sawant Criticize Maharashtra BJP leader on issue Of Corona Vaccination)
लसीकरणावरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांवर सचिन सावंत यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे. त्यात ते म्हणतात की, एक मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. परंतु अत्यंत ढिसाळ आणि नियोजनशून्य मोदी सरकारने लसींचा पुरवठा न केल्याने हा कार्यक्रम देशपातळीवर सुरू होऊ शकणार नाही, ही बाब दुर्दैवी आहे.
जगात लसीकरण युद्धपातळीवर सुरू असताना भाजपाचे राज्यातील प्रवीण दरेकरांसारखे नेते आणि भाजपा आयटी सेल मात्र राज्य सरकारला दोष देत आहे. तसेच अपप्रचार करत आहे. याला चोराच्या उलट्या बोबा म्हणतात. देशातील युवावर्गाची जबाबदारी मोदी सरकारने राज्यांवर ढकलली पण आता लसीकरणातील दिरंगाई ही तरुणाईच्या जीवावर उठणारी आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.
तसेच लसीकरणातील ही दिरंगाई केवळ १८ ते ४४ या वयोगटातच नाही. ४५ वर्षांवरील वयोगटातील लसीकरणही केंद्राने लसींचा पुरवठा नीट न केल्याने सातत्याने अडचणीत येत आहे. महाराष्ट्राला जाहीर केलेल्या ४३५००० रेमडेसीवीरपैकी केवळ २,३०,००० इंजेक्शन पाठवले. मोदी सरकार दिलेले शब्द पाळत नसेल तर राज्यांनी नियोजन कसे करावे? असा सवालही सचिन सावंत यांनी विचारला आहे.