उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अतिवृष्टी पाहणी दौरा रद्द; दिवसभर घरीच करणार विश्रांती, कारण...
By प्रविण मरगळे | Published: October 21, 2020 12:31 PM2020-10-21T12:31:37+5:302020-10-21T12:33:41+5:30
Ajit Pawar News: पंढरपूर येथील दौरा आटोपल्यानंतर अजित पवारांना कणकण जाणवू लागली.
मुंबई – राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचं संकट उभं राहिलं आहे. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचे नुकसान झालं पाहिजे, पिकं वाहून गेली आहेत, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सगळेच नेते दौऱ्यावर आहेत, परंतु नेहमी ग्राऊंडवर काम करणारे अजित पवारांनी अतिवृष्टी पाहणी दौरा टाळला आहे, अजित पवारांना ताप अन् कणकण जाणवत असल्याने त्यांनी घरीच विश्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे, सुदैवाने ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. अजितदादांच्या कोरोना चाचणीबाबत विविध चर्चा सुरु होत्या. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या अजित पवार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच थांबून विश्रांती घेत आहेत. शनिवारी अजित पवारांनी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती.
पुरामुळे बाधित रस्ते, पुलांच्या दुरुस्तीचं कामे करण्याच्या सूचना अजित पवारांनी प्रशासनाला दिल्या. पंढरपूर येथील दौरा आटोपल्यानंतर अजित पवारांना कणकण जाणवू लागली. त्यानंतर त्यांना ताप आला. अजितदादांची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला, परंतु खबरदारी म्हणून अजित पवार घरीच विश्रांती घेत आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, याठिकाणी ते अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत, यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही. जे करू शकत नाही, ते बोलत नाही आणि जे बोलतो ते करतोच, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काटगावातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. मी इथे आकडा जाहीर करायला आलेलो नाही, तर तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. या संकटावर आपण नक्की मात करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
तसेच तुमच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडण्याचं काम याआधीही मी केलं आहे. तुमच्या आशीर्वादामुळेच मी मुख्यमंत्री झालो. माझं कर्तृत्व शून्य आहे, असं मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले. 'यंदाचं वर्ष संकटांचं आहे. वर्षाची सुरुवातच कोरोना महामारीनं झाली. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळानं हाहाकार माजवला. आता परतीच्या पावसानं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. आधी कधीही झाला नव्हता इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे अगदी होत्याचं नव्हतं झालं आहे. मात्र आपण या परिस्थितीतूनही सावरू. पण तुम्ही धीर सोडू नका,अशी साद मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना घातली.