पुणे – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नसल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी केवळ ५ दिवसात पुण्यात ४० ऑक्सिजन बेड्स आणि ४० होम आयसोलेशन बेड्स उभारल्यानं सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
याबाबत नगरसेवक वसंत मोरे म्हणतात की, ५ दिवसात जर मी एकटा साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने एका हॉटेलच्या हॉलमध्ये ४० बेड ऑक्सिजन आणि ४० बेड होम आयसोलेशन हॉस्पिटल चालू करू शकतो, तर मग पुणे महानगरपालिकेच्या १६८ नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त १० बेड केले असते, तर आज संपूर्ण पुणे शहरात १ हजार ६८० बेड तयार झाले असते आणि आपण पुणेकरांना वाचवू शकलो असतो असं त्यांनी सांगितले.
...म्हणून महापालिका अधिकाऱ्यांची गाडी फोडली होती.
काही दिवसांपूर्वी पुणे शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे मृत्यूचा आकडाही वाढत होता. शहरांमध्ये काही ठराविक स्मशानभूमीतच होत असल्याने अंत्यसंस्कारासाठी मृतांच्या नातेवाईकांना वेटिंगवर थांबावे लागत होते. त्यामुळे नागरिकांचा आधीच संताप होत असतानाच रुग्णालयांमधून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह घेऊन जाण्यासाठी शववाहिका / रुग्णवहिका उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या. वसंत मोरे यांच्या जवळच्या नातेवाईंकाचा मृत्यू झाला. त्यांनी उपचारासाठी पुणे महापालिकेकडून रुग्णवाहिका मिळावी यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांना वेळेमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. तब्बल चार तास त्यांना रुग्णवाहिकेची वाट पहावी लागली. त्यामुळे अंत्यसंस्कारांना देखील उशीर झाला. तसेच स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील वेटिंगवर थांबावे लागले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांसाठी वेळेत रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा पुरविता येत नसतील तर त्यांनाही चांगल्या गाड्यांमधून फिरण्याचा अधिकार नाही असं सांगत वसंत मोरेंनी शासकीय गाडी फोडली होती.
रुग्णालयांमध्ये जमिनीवर झोपताहेत रुग्ण; बेड मिळेना
पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढत असून, त्यामुळे शहरातील खासगी आणि सरकारी दोन्ही रूग्णालये रूग्णांनी फुल्ल झाली आहेत. त्यामुळे नवीन नॉन कोविड रूग्णांसाठी जागाच उपलब्ध नाही, अनेक ठिकाणी तर खाली जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर रूग्णांना झोपवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बरेच रूग्ण घरीच सलाइन लावून उपचार घेत आहेत. दरम्यान, रूग्णालयांमधील कर्मचाऱ्यांवरही याचा ताण येत असून, ते देखील हतबल झाल्याचे दिसून येत आहे. अशातच मनसे नगरसेवकाने केलेले कार्य कौतुकास्पद आहे.