नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहेत. दररोज तीन लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र याच दरम्यान अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा असलेला पाहायला मिळत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जबाबदार धरलं आहे. तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
केंद्र सरकारने कोविशिल्ड लशीच्या दोन्ही डोसमधील कालावधी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर ओवेसी यांनी निशाणा साधला आहे. "लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदीच जबाबदार, ते लोकांशी खोटं बोलताहेत" असं म्हटलं आहे. तसेच हा धोरण लकवा (पॉलिसी पॅरालिसिस) असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "जोपर्यंत आपण भारतातील लोकांचं लसीकरण पूर्ण करत नाही, तोपर्यंत लोकांचे जीव वाचवू शकत नाही, असं सर्वच तज्ज्ञ सांगत आहेत. हे करायचं असेल तर मोदी सरकारला हे निश्चित करावं लागेल की, प्रत्येक महिन्याला 300 मिलियन डोस दिले जातील आणि लोकांचं लसीकरण केलं जाईल. पण ते यात अपयशी ठरले आहेत" असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.
"लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. त्यांनी उशिराने लशींची ऑर्डर दिली. आपल्याकडे पारदर्शकता नाही. ते लोक खोटं सांगताहेत की, पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस चार आठवड्यांनी घ्यावा. हे सहा आठवड्यांसाठी पुन्हा स्थगित करण्यात आलं. आता हा कालावधी 12 ते 16 आठवड्यांचा आहे. यातून धोरण लकवाच (पॉलिसी पॅरालिसिस) दिसून येत आहे" अशा शब्दांत ओवैसी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. याआधी काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी देखील ओवैसी यांनी केली होती.
"मोदी स्मशानभूमी आणि कब्रिस्तानवर बोलू शकतात पण..."; असदुद्दीन ओवैसींचा जोरदार हल्लाबोल
"पंतप्रधान संसद आणि पत्रकार परिषदांना सामोरे जाण्यास घाबरतात. ते स्मशानभूमी आणि कब्रिस्तानबद्दल तासनतास बोलू शकतात. मात्र ते रुग्णालयांबद्दल कधीही बोलू शकत नाहीत. ज्यांनी ऑक्सिजन, बेड्स, औषधांच्या कमतरतेमुळे आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांची मोदींनी माफी मागावी" असं ओवैसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. तसेच असदुद्दीन ओवेसी यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली होती. केंद्र सरकार आतापर्यंतचं अवैज्ञानिक सरकार असल्याचं म्हणत ओवेसी यांनी सरकारवर टीका केली होती.