CoronaVirus Live Updates : "हातावर पोट असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाची आधी सोय करा मगच लॉकडाऊनचा विचार करा" 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 02:29 PM2021-04-03T14:29:43+5:302021-04-03T14:37:55+5:30

BJP Keshav Upadhye Slams CM Uddhav Thackeray Over CoronaVirus Lockdown : राज्यातील वाढती संख्या लक्षात घेता या काळात कोरोना चाचणी मोफत उपलब्ध करावी आणि कोरोनाचे उपचार शासकीय व खासगी रुग्णालयात मोफत उपलब्ध करावेत, अशी मागणी उपाध्ये यांनी केली.

CoronaVirus Live Updates BJP Keshav Upadhye Slams CM Uddhav Thackeray Over CoronaVirus Lockdown | CoronaVirus Live Updates : "हातावर पोट असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाची आधी सोय करा मगच लॉकडाऊनचा विचार करा" 

CoronaVirus Live Updates : "हातावर पोट असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाची आधी सोय करा मगच लॉकडाऊनचा विचार करा" 

googlenewsNext

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनता, हातावरचे पोट असणारा गोरगरीब, कष्टकरी, बारा बलुतेदार, छोटे उद्योजक यांना जगण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने प्रथम व्यवस्था उभी करावी मगच लॉकडाऊनचा विचार करावा. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही कोरोनाच्या संकटात सरकारला साथ देऊ, पण सरकारने सामान्य जनतेचा पूर्ण विचार करून निर्णय घ्यावा असं भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी म्हटलं आहे. मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी असं म्हटलं आहे.

राज्यातील वाढती संख्या लक्षात घेता या काळात कोरोना चाचणी मोफत उपलब्ध करावी आणि कोरोनाचे उपचार शासकीय व खासगी रुग्णालयात मोफत उपलब्ध करावेत, अशी मागणी उपाध्ये यांनी केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शुक्रवारच्या फेसबुक लाईव्हमध्ये गांजलेल्या जनतेच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आशा होती मात्र ती सपशेल फोल ठरली. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी ठोस कृती आराखडा, अंमलबजावणीचा पथ, विशेष उपाययोजना याबाबत मुख्यमंत्र्यांकडून किमान अपेक्षा होत्या मात्र कोणतीच ठोस कृती, निर्णय किंवा यापुढची उपाययोजना मुख्यंत्र्यांनी सांगितली नाही. त्यांनी केवळ लॉकडाऊनचा इशारा दिला. गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारच्या दिशाहीन धोरणामुळे हजारो कुटुंबांची अक्षरशः वाताहत झाली. आता पुन्हा लॉकडाऊन केल्यास अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होतील असं म्हटलं आहे.

"केंद्र सरकारने गेल्या वर्षी लॉकडाऊन केल्यानंतर समाजातील विविध घटकांची काळजी घेत पॅकेज दिले होते. जवळपास सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत पाच किलो गहू, तांदूळ आणि एक किलो चणा मोफत अथवा किमान किंमतीमध्ये दिला होता. याचा 80 कोटी जनतेला लाभ झाला होता. तसेच 8 कोटी कुटुंबांना गॅस सिलेंडर मोफत दिले होते. शेतकरी, महिला व गोरगरीब यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम दिली होती. केंद्र सरकारने सर्वसामान्य लोकांना केलेल्या मदतीखेरीज काही राज्यांनी आपापल्या तिजोरीतून त्या राज्यातील जनतेला पॅकेज दिले. परंतु, शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने मात्र आजपर्यंत राज्यातील सर्वसामान्य जनतेला कोणतेही पॅकेज दिलेले नाही" असं देखील उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षी राज्यात लॉकडाऊन घोषित करताच भाजपाचे सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून लोकांना सर्व प्रकारची मदत केली आहे. आताही भाजपाचा कार्यकर्ता राज्याचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. पण राज्य सरकारने निस्वार्थीपणाने जनतेची काळजी करावी, कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, लसीकरणाची मोहिम गंभीरतेने राबवावी, सर्वसामान्य व्यक्तींना ओषधोपचार मिळतील याकडे लक्ष द्यावे व ज्यांना ओषधोपचार परवडणार नाहीत त्यांना मोफत उपचार द्यावेत असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. 

Web Title: CoronaVirus Live Updates BJP Keshav Upadhye Slams CM Uddhav Thackeray Over CoronaVirus Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.