नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर गेली असून दोन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागल आहे. काही राज्यांत कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बिहार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोरोना परिस्थितीवरून निशाणा साधला आहे.
कोरोना आणि बिहार सरकारमध्ये साम्य असल्याचं लालू प्रसाद यादव (RJD President Lalu Prasad Yadav) यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "कोरोना आणि बिहार सरकारमध्ये काही साम्य आहे. दोघेही जनतेच्या जीवासाठी घातक आहेत आणि दोन्ही अदृश्य (दिसून येत नाही) आहेत" असं म्हणत लालू प्रसाद यादव यांनी टीकास्त्र सोडलं आहे. या आधी यादव यांनी बक्सरमधील येथील नदीत आढळून आलेल्या मृतदेहांवरून देखील सरकारला घेरलं होतं. "कुठं घेऊन जात आहात देशाला व मानवतेला?" असं म्हणत जोरदार टीका केली आहे. सध्या लालू प्रसाद यादव हे जामिनावर तुरूंगातून बाहेर आले आहेत.
"जिवंतपणी औषध, ऑक्सिजन, बेड आणि उपचार नाही दिले. मृत्यूनंतर लाकडं, दोन फूट कापड आणि जमीन देखील नशीबी आली नाही. मृतदेहांना गंगेत फेकण्यात आलं. जंगली प्राणी मृतदेहांची लचके तोडत आहेत. हिंदुंचं दफन केलं जात आहे, कुठं घेऊन जात आहात देशाल व मानवतेला?" असं ट्विट लालू प्रसाद यादव यांनी केलं आहे. यादव यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची तुलना १९९६-९७ सालच्या पोलिओ लसीकरण मोहिमेशी केली. तसंच सध्या सरकार पैसे घेऊनही लस उपलब्ध करून देऊ शकत नसल्याचं म्हटलं. "१९९६-९७ मध्ये जेव्हा देशात जनता दलाचं सरकार होतं तेव्हा आम्ही पोलिओ लसीकरणात जागतिक विक्रम केला होता," असं लालू प्रसाद यादव म्हणाले.
"आज लोकांकडून पैसे घेऊनही लस उपलब्ध करता येत नाहीये हे पाहून अतिशय दु:ख होत आहे. या महासाथीच्या काळाक देशभरातील लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशवासीयांचं मोफत लसीकरण करण्याची त्यांनी घोषणा करावी असं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करत आहेत," असं लालू प्रसाद यादव यांनी नमूद केलं. राज्य आणि केंद्रासाठी लसींची किंमत निरनिराळी असू नये. राज्यांमुळेच देशाची निर्मिती होते. प्रत्येक नागरिकाचं लसीकरण टप्प्याटप्प्यानं मोफत झालं पाहिजे ही केंद्राची जबाबदारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.