नवी दिल्ली – भारतात कोरोना संक्रमणाचा वेग थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. कोरोना दिवसेंदिवस नवे रेकॉर्ड तोडत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात १ लाख ८५ हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळले. तर १ हजाराहून जास्त लोकांचा मृत्यू झाला. यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, दिल्लीचे अरविंद केजरीवाल या सर्व मुख्यमंत्र्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी नवे निर्बंध लावले आहेत. परंतु लॉकडाऊन शब्दाचा वापर करण्यापासून सगळे सतर्क राहत आहेत.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य सरकार लॉकडाऊन ऐवजी कोरोना कर्फ्यू, जनता कर्फ्यू असं नाव देत आहेत. देशात सर्वात जास्त कोरोना संक्रमण महाराष्ट्रात आढळलं आहे. याठिकाणी आतापर्यंत ३५ लाखाहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. यातील २६ लाखाहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. दिवसाला राज्यात ६० हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. तर मुंबईत मंगळवारी १० हजार रुग्ण आढळले.
अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सरकारनं कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक कडक निर्बंध लावले आहेत. बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून हे निर्बंध राज्यात लागू होतील. महाराष्ट्रात ब्रेक द चेन नावानं पुढील १५ दिवस कलम १४४ लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घराबाहेर पडण्यासही बंदी घातली आहे. वॉटर पार्क, स्विमिंग पूल, शुटींग, मॉल्स, सिनेमा हॉल वैगेरे सर्वकाही बंद करण्यात आलं आहे. हे एक प्रकारे लॉकडाऊनसारखं आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन शब्दाचा वापर केला नाही. त्यांनी पुढील १५ दिवस काय सुरू असेल आणि काय बंद हे लोकांना सांगितले.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही कोरोना रूग्णांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत एकूण ७ लाख ५० हजाराहून कोरोना संसर्ग झाल्याची नोंद झाली असून त्यापैकी ६ लाख ९५ हजार सक्रीय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत दिल्लीमध्ये कोरोनाचे १३ हजाराहून अधिक रुग्ण आढळले. केजरीवाल सरकारने दिल्लीत रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत नाईट कर्फ्यू लावला आहे. रात्रीच्या कर्फ्यूव्यतिरिक्त अनेक निर्बंधही लावण्यात आले आहेत. दिल्लीत सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, धार्मिक मेळाव्यावर सरकारने बंदी घातली आहे. केवळ ५० लोक विवाह सोहळ्यास उपस्थित राहू शकतात तर जास्तीत जास्त २० लोक अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकतात.
बारावीपर्यंतच्या दिल्लीतील सर्व शाळा बंद करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्समध्ये बसण्याची एकूण क्षमता ५० टक्के असेल. दिल्ली मेट्रो आणि बसमध्ये ५० टक्के प्रवासी प्रवास करण्याची परवानगी आहे. केवळ ५० टक्के क्षमता असलेल्या सिनेमा हॉलमध्ये बसण्याची परवानगी आहे. तथापि, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की लॉकडाऊन हा कोरोना विषाणूविरूद्ध लढण्याचा उपाय नाही. एक प्रकारे दिल्लीत बरीच बंधने असतील पण लॉकडाऊन हा शब्द वापरला नाही.
उत्तर प्रदेशातही कोरोना संसर्गाचा कहर सतत वाढत आहे. राज्याची राजधानी लखनौमध्ये दिवसेंदिवस स्थिती गंभीर होत चालली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ते सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यापर्यंत सर्व नेते आणि अधिकारी कोरोनाच्या जाळ्यात आले आहेत. कोरोना साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगी सरकारने कलम १४४ लागू केला आहे आणि त्याच वेळी सर्व शहरांमध्ये रात्रीचे कर्फ्यूदेखील लागू केले गेले. याशिवाय सर्व धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तथापि, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लॉकडाऊन लादण्याची गरज नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. आम्हाला लोकांचे जीवन व उत्पन्नाचे साधन दोन्ही वाचवावे लागेल. कोरोना रोखण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची पावले उचलत आहोत असं त्यांनी सांगितले.
लॉकडाऊन या शब्दाला मुख्यमंत्री का घाबरले आहेत?
गेल्यावेळेहून अधिक भयंकर कोरोनाची दुसरी लाट आहे. मात्र असं असूनही राज्य सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार या वेळी लॉकडाऊन लागू करण्याचं धैर्य दाखविण्यास सक्षम नाहीत. याचे मोठे कारण म्हणजे शेवटच्या वेळी जेव्हा मोदी सरकारने देशभरात लॉकडाऊन लावला, तेव्हा विरोधकांनी बरेच प्रश्न उपस्थित केले होते. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींपासून सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यापर्यंत अचानक लॉकडाऊनची घोषणा झाली त्यावर टीका केली होती. त्याचसोबत लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. स्थलांतरण वाढलं. लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. हेच कारण आहे की या वेळी कोणतेही सरकार लॉकडाऊन शब्दाचा वापर करत नाही, परंतु लॉकडाऊन म्हणून अनेक कडक निर्बंध लादले जात आहेत.