मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. ( Coronavirus in Maharashtra) कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दरम्यान, राज्य सरकारने (Maharashtra government ) लावलेले लॉकडाऊन आणि ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारच्या कोरोनाकाळातील कारभारावर माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे ( Narayan Rane) यांनी घणाघाती टीका केली आहे. ( Narayan Rane Says '' Maharashtra government fails to stop corona outbreak, due to mismanagement '')
आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले की, कोरोनाचा फैलाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात दिवसाला ६० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. हे पाप ठाकरे सरकारचे आहे. देशातील एकूण मृतांपैकी ४१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
तसेच राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनवरही नारायण राणे यांनी टीका केली आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन लावून दोन दिवस झाले. पण त्याचा परिणाम दिसत नाही आहे. सर्व शहरांत बाजारपेठा सुरू आहे. लोकांनी गर्दी केली आहे. अनेक घरांत अन्न नाही अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी दुकाने बंद ठेवल्याने उपासमारिची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने काही घटकांना पॅकेज दिलं आहे. मात्र दीड हजार रुपयांत पाच माणसांच कुटुंब कसं चालेल. पॅकेज जाहीर करायची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सरकार कुणाकुणाला पॅकेज देणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीचा काहीही परिणाम दिसून येत नाही आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत राज्याला लॉकडाऊन परवडणार आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रावरही नारायण राणे यांनी टीका केली. हे सरकार दोन वेळच्या जेवणासाठीही केंद्र सरकारला पत्र लिहील आणि जेवण पाठवा म्हणून सांगेत, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला.