मुंबईः आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर सगळ्यांच्याच काळजात धस्स झालं होतं. परंतु, धारावीमध्ये झालेलं काम, कोरोना नियंत्रणासाठी झालेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांची दखल थेट जागतिक आरोग्य संघटनेनं घेतलीय आणि या ‘धारावी पॅटर्न’चं कौतुकही केलंय. ही महाराष्ट्रासाठी नक्कीच आनंदाची बाब आहे, पण त्यावरून आता श्रेयवादाचं राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. धारावीतील यशाचं श्रेय सरकारचं नाहीच, असं म्हणणाऱ्या भाजपाला शिवसेनेनं मुखपत्रातून खोचक टोला हाणला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी धारावीच्या अनेक भागांत अहोरात्र काम केलं. त्यांचा कोणताही गाजावाजा केला नाही. त्यांच्या मेहनतीमुळे धारावी आज कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याचं श्रेय महाराष्ट्र सरकारला देणं हे या संस्थांवर अन्याय करण्यासारखं आहे, अशी टिप्पणी भाजपा आमदार नितेश राणेंनी केली होती. या ट्विटमध्ये त्यांनी डब्ल्यूएचओलाही टॅग केलं होतं. त्यानंतर, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी काही फोटो शेअर केले. 800 संघ स्वयंसेवकांच्या अविरत कार्यामुळेच धारावीतील कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा त्यांनी केला. भाजपा नेत्यांच्या या विधानांचा समाचार ‘सामना’च्या अग्रलेखातून घेण्यात आला आहे.
''धारावीत जे कोरोनावर यश मिळालं ते फक्त संघ स्वयंसेवकांमुळेच!'' असा नवा प्रचारी फंडा राबवला जातोय. हा जरा अतिरेकच झाला. पांढऱ्या कपड्यांतील देवदूतांचा अपमान आहे. म्हणजे काही चांगले घडले की, आमच्यामुळे! रेड्याला रेडकू झाले आमच्यामुळे, वाळवंटात हरभरा टरारून वर आला आमच्यामुळे. हे असले प्रकार यांना संकटसमयी सुचतात तरी कसे?, असा ‘रोखठोक’ सवाल शिवसेनेनं केला आहे. ‘‘संघाचे काम चांगले नाही असे कोणी म्हणणार नाही, पण धारावीतील कोरोना नियंत्रणाच्या कार्यात सर्वच यंत्रणांनी मेहनत घेतली आहे. हे यश सामुदायिक आहे, मात्र त्यातही मुंबई महापालिकेचे काम मोठे आहे हे तुम्ही मान्य करणार की नाही? दिल्ली, उत्तर प्रदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड वगैरे भागांत स्वयंसेवकांचे अस्तित्व आहे, मग तेथे संघ धारावीप्रमाणे दक्ष का नाही?’’, अशी विचारणाही त्यांनी केलीय.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस हे सध्या राज्यभर दौरे करून कोरोना संकटाची माहिती करून घेत आहेत व कोरोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे. आता प्रवचनं नकोत. सगळ्या नकारात्मक परिणामांमधून जनतेची सुटका कशी होईल, तेवढंच सांगा साहेब, असा टोमणा अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांना मारला आहे.
केंद्राने उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांकडे कोरोनासंदर्भात जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. उत्तर प्रदेश 'मॉडेल'वर पुन्हा कडक लॉक डाऊन लादण्याची वेळ यावी याचा अर्थ काहीतरी चुकले आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका येत आहेत. त्यामुळे भाजपास हे राज्यसुद्धा कोरोनासंदर्भात महत्त्वाचे आहे, अशी मार्मिक टिप्पणी शिवसेनेनं केलीय.
दरम्यान, धारावीतील परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलं असून त्याबद्दल शाबासकीही दिली आहे. जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत की, कोरोनाचा उद्रेक कितीही मोठा असला तरी तो नियंत्रणात आणला गेलेला आहे. यापैकी काही उदाहरणं इटली, स्पेन आणि दक्षिण कोरिया आणि धारावीमध्येही आढळतात. मुंबईतील या झोपडपट्टी परिसरातील लोकांची चाचणी, ट्रेसिंग, सामाजिक अंतर आणि संक्रमित रुग्णांवर त्वरित उपचार करण्याच्या पद्धतीमुळे धारावी कोरोनावर विजय मिळवण्याच्या मार्गावर आहे, अशी दाद डब्ल्यूएचओनं दिली आहे.
संबंधित बातम्याः
शाब्बास, तुम्ही जगासमोर आदर्श ठेवलात; धारावीकर अन् योद्ध्यांची मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ
''धारावीत RSS च्या 800 स्वयंसेवकांमुळेच कोरोना नियंत्रणात''
'भाजपने धारावीतील यशाचे श्रेय घेणे म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती'
"RSS अन् NGO दिवसरात्र झटल्यानेच धारावी कोरोनामुक्त, सरकारला श्रेय देणं हा त्यांच्यावर अन्याय"