नवी दिल्ली - देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असतानाच आता कोरोनाच्या सिंगापूर स्ट्रेनवरून राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. (Coronavirus in Delhi) सिंगापूर स्ट्रेनबाबत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांनी केलेले विधान केंद्र सरकारने खोडून काढल्यानंतर आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ( Manish Sisodia ) यांनी केंद्र सरकारला खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे. आज भाजपा गलिच्छ राजकारण करत आहे. केजरीवाल यांना मुलांची चिंता आहे आणि केंद्र सरकार सिंगापूरसाठी चिंतीत आहे, असा टोला सिसोदिया यांनी लगावला. ( Manish Sisodia Says, "The Central Government is concerned about Singapore, we are concerned about our children" )
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, यापूर्वी लंडनमधून स्ट्रेन आला होता तेव्हा भारत सरकारच्या बेफिकीरीमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. आज जगभरातील डॉक्टर लहान मुलांना धोका असल्याचा इशारा देत आहेत. त्यातून वेळीच सावध होण्याऐवजी सिंगापूरला मुद्दा बनवण्यात येत आहे.
कोरोनाच्या पुढच्या लाटेमध्ये लहान मुलांना धोक्यापासून दूर ठेवण्याबाबच चिंता केली पाहिजे. मात्र भाजपाला सिंगापूरच्या प्रतिमेची चिंता आहे. मात्र मुलांची चिंता नाही. भाजपा आणि केंद्र सरकारला परदेशातील इमेजसाठी शुभेच्छा, आम्ही मात्र आमच्या मुलांची चिंता करू, असा टोला सिसोदिया यांनी केंद्र सरकारला लगावला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंगापूर स्ट्रेनबाबत चिंता व्यक्त केली होती. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये केजरीवाल म्हणाले होते की, सिंगापूरमधून आलेले कोरोनाचे नवे रूप मुलांसाठी खूप धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतामध्ये ते तिसऱ्या लाटेच्या रूपात येऊ शकते. केंद्र सरकारला माझे आवाहन आहे की, त्यांनी सिंगापूरसोबत असेलली विमानसेवा तत्काळ प्रभावाने रद्द करावी. तसेच मुलांसाठीही लसीच्या पर्यायांवर प्राथमिकतेच्या आधारावर काम झाले पाहिजे.