मुंबई – राज्यात कोरोना महामारीची दुसरी लाट पसरली आहे. दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे. यातच कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाकरे सरकारनं १५ मे पर्यंत ब्रेक द चैन अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेली मागणी मान्य करून अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.
परराज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवा असं राज ठाकरे(MNS Raj Thackeray) म्हणाले होते. त्यावरून मुख्यमंत्री बैठकीत म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत गेले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल असं उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) अधिकाऱ्यांना आदेश दिले.
याबाबत मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई म्हणाले की, राजसाहेब जेव्हा सरकारला एखादी सूचना करतात तेव्हा ती महाराष्ट्राच्या हिताचीच असते. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंदणी करा अशी सूचना राज ठाकरेंनी केली होती. पण त्याचे राजकारण केले गेले. मात्र आज जेव्हा परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. तेव्हा सरकारला स्वत:ची चूक कळली आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना परप्रांतीय मजुरांची नोंदणी व आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले असं त्यांनी सांगितले.
तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोर नियोजन करा
कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनांना दिल्या. राज्यातील कडक निर्बंधांमुळे काही प्रमाणात रुग्ण संख्या स्थिरावली असली तरी आपल्याला आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की , कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्येत उतार पडेल असे नाही. तरी देखील वेळेत कडक निर्बंध लावल्याने अंदाजित मोठी रुग्ण वाढ आपण रोखू शकलो.
तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्वाचा आहे पण त्यासाठी पुरेश्या प्रमाणात व वेळेवर लस पुरवठा अतिशय गरजेचा आहे. आपण आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे मात्र पुरवठ्यावर त्याचे नियोजन करावे लागेल तसेच जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी देखील व्यवस्थित पार पाडावी लागणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.