- शीलेश शर्मा नवी दिल्ली : कोरोना साथीला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे कोणतीही रणनीती नाही. लसीकरण मोहीम मोदी सरकारने योग्य पद्धतीने राबविली नाही तर कोरोना साथीच्या लाटांवर लाटा थडकत राहतील व त्या अधिक भयानक असतील असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिला. (Modi government has no strategy to stop the outbreak, says Rahul Gandhi)ते म्हणाले की, कोरोना साथीचे निर्मूलन करायचे असेल तर लसीकरण हाच एकमात्र उपाय आहे. लॉकडाऊन, मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे यामुळे कोरोना साथ संपणार नाही. तिचे निर्मूलन करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. कोरोना लस देण्यात आपण जितका उशीर करू तितके या विषाणूची नवनवीन उत्परिवर्तने व प्रकार अस्तित्वात येऊन माणसांवर हल्ला करतील. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याचीही भीती आहे. कोरोना विषाणू आपले रूप सतत पालटत असतो. राहुल गांधी यांनी सांगितले की, कोरोना साथ भीषण रूप धारण करू शकते, असा इशारा मी पहिल्यापासून देत होतो, पण त्याकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केले. देशातील लोकसंख्येपैकी फक्त तीन टक्के लोकांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
विदेशातून लसी आणाकाँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, जगातील अनेक देशांत कोरोना प्रतिबंधक लसी तयार होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लसी भारतात शक्य तितक्या लवकर आणाव्यात.