नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा एका दिवसात १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर अवघ्या अडीच आठवड्यांत हा आकडा ३ लाखांच्या पुढे गेला. गेल्या ६ दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. मृतांच्या संख्येतही दररोज वाढ होत आहे. त्यामुळे स्मशानभूमी, कब्रस्तानांमध्ये अक्षरश: रांगा लागल्या आहेत. देशातील काही महत्त्वाच्या शहरांमधील स्मशानभूमी २४ तास सुरू आहेत. यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. दिल्लीत अंत्यसंस्कारासाठी २० तासांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचं वृत्त सुरजेवाला यांनी ट्विट केलं आहे. 'हे मानवतेच्या विरोधात आहे. हा गुन्हा आहे. अंत्यसंस्कारासाठी लागलेल्या या रांगा अहंकारी शासक दगडाच्या काळजाचे असल्याचा हा पुरावा आहे. आपल्याच लोकांच्या मृतदेहांचा पाया रचून सरकार मजबूत होऊ शकत नाही. या घटना आणि हे फोटो मोदी सरकारचा आयुष्यभर पिच्छा पुरवतील, अशी सुरजेवालांनी केली आहे.
CoronaVirus News: हे फोटो मोदी सरकारला आयुष्यभर छळतील; काँग्रेस नेते सुरजेवाला यांचा थेट निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 3:58 PM