नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या थैमान घातले आहे. देशभरात दररोज अडीच लाखांहून अधिक रुग्ण सापडू लागल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अशा परिस्थितीतही देशात आयपीएल स्पर्धा खेळवली जात आहे. त्यावरून अभिनेता कमाल आर. खान याने गृहमंत्री अमित शाहा यांच्यावर टीका केली आहे. (KRK Criticise Amit Shah & Modi Government) देशात कोरोनामुळे लोक रस्त्यांवर मरत आहेत. आणि अमित शाहांचे चिरंजीव क्रिकेट सामने आयोजित करत आहेत, असा टोला त्याने लगावला. यावेळी आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटूंवरही त्याने टीका केली. ( "People are dying due to coronavirus and Amit Shah's Son jay Shah is Organizing IPL")
अभिनेता कमाल खान आपल्या ट्विटमध्ये म्हणाला की, आज देशात कोरोनामुळे चहुकडे हाहाकार माजलेला आहे. लोक रस्त्यांवर उपचारांविना मरत आहेत. अशा परिस्थितीत अमित शाहांचा मुलगा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत आहे. आणि नालायक क्रिकेटपटू क्रिकेट खेळण्यात गुंग आहेत.
दरम्यान, कमाल आर. खान याने एक अजून पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने कुंभमेळ्यात केवळ गरिबांच्याच असणाऱ्या सहभागावरून निशाणा साधला आहे. त्यात तो म्हणतो. तुम्ही कधी अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला यांच्यापैकी कुणी कुंभमेळ्यात गेलेला पाहिलाय का? कुणीच नाही. केवळ गरीब लोक आपली पापे धुण्यासाठी कुंभमेळ्यात जातात. आता कोरोना कुणाला झाला गरीबांनाच ना. मेले कोण गरीबच. म्हणजेच सर्व संकटांचा ठेका गरीबांनीच घेतलेला आहे, असे तो म्हणाला.
केआरकेने अजून एक ट्वीट केले असून, त्यामधून त्याने मोदी सरकारवर टीका केली आहे. सरकारचा एकच थेट फंडा आहे. निवडणुकाही होतील आणि कुंभमेळाही होईल. लोक जगोत वा मरोत, असे त्याने म्हटले आहे.