पारनेर – सध्या राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या कार्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. निलेश लंके यांनी भाळवणी येथे शरद पवार आरोग्य मंदिर उभारलं असून याठिकाणी कोरोनाग्रस्तांसाठी ११०० बेड्स उपलब्ध करून दिले आहेत. इतकचं नाही तर स्वत: आमदार निलेश लंके याठिकाणी उपस्थित राहून घरच्या माणसाप्रमाणे लोकांची काळजी घेताना दिसत आहेत.
अलीकडेच निलेश लंके यांचे व्हिडीओ, बातम्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. कोरोना सेंटरमध्येच आमदार निलेश लंके जेवण करतात. तिथेच मुक्काम करतात. सगळ्या लोकांची आपुलकीने काळजी घेतात. निलेश लंके यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंकेंना फोन केला आणि त्यांची विचारपूस केली. हॅलो, मी अजित पवार बोलतोय, निलेश कसा आहेस...अरे बाबा तू स्वत:ची काळजी घे. रुग्णांची सेवा करतोय हे वाचून,व्हिडीओ पाहून आनंद वाटला. पण स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नको, काळजी घेत जा, आणि काही लागलं तर फोन कर असा मोलाचा सल्ला अजितदादांनी आमदार निलेश लंकेंना दिला आहे.
निलेश लंके यांच्या कामाचं कौतुक
भाळवणीच्या या कोविड सेंटरवर लंके हे स्वत: लोकांसाठी झटत आहे. रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणं, ताप, रुग्णांची विचारपूस अशी अनेक कामं ते करताना दिसतात. याशिवाय या ठिकाणी असलेल्या लोकांना पौष्टीक आहारदेखील पुरवला जातो. तसंच दिवसातून दोन वेळा रुग्णांची तपासणीही केली जाते. त्यांच्यासाठी योग, काही सांस्कृतिक कार्यक्रमही याठिकाणी आवश्यक ती काळजी घेऊन राबवले जातात. लंके यांच्या या कामाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून त्यांना मदतीचा ओघही सुरू झाला आहे. पहिल्या लाटेतही त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी उभारलेल्या कोविड सेंटरची दखल शरद पवार यांनी घेतली होती.
कोविड सेंटरसाठी परदेशातून मदतीचा ओघ
प्रत्येक रूग्णांसाठी स्वतंत्र थर्मास, मास्क, स्टिमर, नॅपकिन, पाणी बाटली, साबण आदी मूलभूत सुविधा दिल्या जात आहे. २४ तास पिण्यासाठी, आंघोळीसाठी, वापरण्यासाठी गरम पाणी. सकस जेवण. दूध, अंडी, सूप आदींचा समावेश यामध्ये आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आयुर्वेदिक काढे दिले जात आहे. निलेश लंके यांनी केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसमावेशक मदत घेऊन, वर्गणी आणि देणगीतून हे कोविड सेंटर उभारलं आहे. तसेच निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही आर्थिक मदत मिळत आहे.
आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशातून आर्थिक मदत मिळाली आहे. इतकेच नाही तर काही परदेशी नागरिकांनी देखील निलेश लंके प्रतिष्ठानच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत. केवळ परदेशातून १ कोटी २० लाख रुपयांची आर्थिक मदत निलेश लंके यांना मिळाली आहे.
जिल्ह्यात साखर कारखानदार व शिक्षण सम्राट आहेत. त्यांनी कोविड सेंटर उभारण्यात रस दाखविला नाही. लंके यांच्या पाठीशी मात्र कुठलीही संस्था नसताना त्यांनी सेंटर उभारले. ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, मी हे सेंटर उभारण्याचे ठरविले व हजारो हात माझ्या मदतीला आले. परदेशांतूनही मदत आली. मुलांनी खाऊचे पैसे या केंद्रासाठी पाठविले. सुमारे दहा ट्रक धान्य, भाजीपाला, फळे अशी रसद मिळाली. आत्तापर्यंत बाविसशे रुग्ण बरे झाले.
केंद्रात रुग्णांचे मनोरंजन : कोरोना रुग्णांच्या मनातील भीती घालविणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यामुळे मी स्वत: न घाबरता रुग्णांजवळ जातो. रात्री दीड-दोन वाजताही रुग्णांना काही त्रास होत आहे का, यावर लक्ष ठेवतो. येथे वातावरण जाणीवपूर्वक आनंदी ठेवले आहे, असे निलेश लंके यांनी सांगितले.