मुंबई – कोरोना काळात मास्क घालणं सर्वांना बंधनकारक केले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र अनेकदा विनामास्क वावरताना दिसत असतात, यातच आज नाशिक दौऱ्यावेळीही राज ठाकरेंनी मास्क परिधान केला नव्हता, त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना चिमटा काढला आहे, मास्क नेमकं का वापरायचं नाही? याचं ठोस कारण सांगावं असं आवाहन राऊतांनी राज ठाकरेंना केले आहे.(Shivsena MP Sanjay Raut Target MNS Chief Raj Thackeray over not wearing mask in Corona situation)
याबाबत संजय राऊत म्हणाले की, कोरोनामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आणि राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) नियमावलींचे पालन करण्याच्या सूचना देतात, सर सलामत तो पगडी पचास, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जे भोगावे लागते ना...तेव्हा वाटतं अरेरे ऐकायला हवं होतं, मास्क घालायला हवा होता, मग आधीच ऐका ना, ते मनसेचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलणार? मास्क का वापरत नाहीत याच ठोस विश्लेषण राज ठाकरेंनी करणं गरजेचे आहे असं राऊतांनी सांगितले.
त्याचसोबत पंतप्रधान, मुख्यमंत्री सांगतात मास्क वापरा, तसं राज ठाकरेंनी मास्क का वापरू नये हे पटवून द्यावं, मास्क न वापरणे नागरिकांसाठी धोकादायक आहे, अजित पवारांनीही विधानसभेत काल तेच सांगितले, ते स्वत: या संकटातून गेलेत, मुख्यमंत्र्यांचा आरोग्यावर चांगला अभ्यास आहे, जागतिक आरोग्य संघटनेने काही मापदंड घालून दिले आहेत. त्याचे पालन केले पाहिजे, मास्क ही खरी लस आहे असंही संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंपी करतात तेव्हा...
कोरोनाविरुद्ध ही लढाई लढताना आमच्याकडूनही कधी ढिलाई होते, परंतु तसं चालत नाही, मी अनेकदा नियमांचे पालन करतो, परंतु मास्क खाली येताच मला मुख्यमंत्र्यांची आठवण येते, कारण त्यांनी असं पाहिलं तर ते ताबडतोब चंपी करतात, प्रेमाने असो वा काळजीपोटी..मास्क घालण्याचा आग्रह कायम असतो असंही संजय राऊतांनी सांगितले.
MP असले म्हणून काय झालं? पोलीस अधिकाऱ्याचं बाणेदार उत्तर
काही दिवसांपूर्वी दिल्लीत मला स्वत:ला मास्क न वापरण्याचा दंड भरावा लागला आहे, विमानतळावर गाडीतून जात असताना फोनवर बोलण्यासाठी मी मास्क थोडा खाली केला, तेव्हा पोलीस पथकाने मला पकडलं, माझी गाडी बाजूला घेतली, तेव्हा माझ्या पीएने सांगितलं, MP साहेब आहेत, त्यावर पोलीस अधिकाऱ्यानं MP असले म्हणून काय झालं असं बाणेदार उत्तर दिलं, माझ्याकडून २ हजारांची पावती फाडली, मी नियम मोडला होता त्यामुळे मी लगेच दंड भरला असा किस्साही संजय राऊतांनी सांगितला.
अजित पवारांनीही लगावला होता टोला
राज्यावरचं कोरोनाचं संकट अद्याप टळलं नाही, अलीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, अमरावती, अकोला, पुणे, अशा विविध भागात कोरोना वाढत आहे, प्रशासकीय पातळीवर बैठका सुरू आहेत, सगळ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत, मास्क लावणे, सुरक्षित अंतर पाळणं याचे नियम पाळलेच पाहिजे. काही नेते म्हणतात मी मास्क वापरत नाही, पण दुसऱ्यांना त्रास झाला तर त्याचं काय...एकेकाळी प्रविण दरेकरांचे ते नेते होते असं म्हणत अजित पवारांनी(DCM Ajit Pawar) नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला होता.