फिरोजाबाद – यूपीच्या फिरोजाबाद जनपद येथील आमदार रामगोपाल उर्फ पप्पू लोधी हे ३० एप्रिल रोजी कोरोना संक्रमित झाले होते. त्यांच्यासोबत पत्नी संध्या लोधी यादेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. सुरुवातीला यांना फिरोजाबाद येथील आयसोलेशन वार्डात दाखल केले होते. आमदार रामगोपाळ उर्फ पप्पू लोधी यांची तब्येत बरी झाल्यानंतर त्यांना शनिवारी आयसोलेशन वार्डातून डिस्चार्ज मिळाला.
परंतु आमदाराच्या पत्नीची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये ७ मे रोजी उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी पप्पू लोधी यांच्या म्हणण्यानुसार पत्नीला जवळपास ३ तास जमिनीवरच झोपवावं लागलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून बेड उपलब्ध झाला. आता आमदाराच्या पत्नीची अवस्था कशी आहे हे डॉक्टरांनी सांगितले नाही.
भाजपा आमदाराने सांगितले की, एसएन मेडिकल कॉलेजमध्ये बायकोवर चांगल्यापद्धतीने उपचार होत नाहीत. जर आमदाराच्या बायकोला जमिनीवर झोपावं लागलं असेल तिला उपचार वेळेत मिळत नसतील तर सर्वसामान्य जनतेची काय अवस्था असेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझ्या बायकोच्या तब्येतीबाबत कोणीही काही सांगत नाही. तिला जेवण मिळत नाही, पाणी नाही अधिकारी आणि डॉक्टरही काय बोलत नाही असा आरोप त्यांनी केला.
दिल्ली, महाराष्ट्र यासारख्या राज्याप्रमाणे उत्तर प्रदेश कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. सर्वाधिक लखनौ, कानपूर अशा मोठ्या शहरांची अवस्था बिकट झाली आहे. मागील २४ तासांत यूपीत २६ हजार ८४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. लखनौमध्ये सर्वाधिक २ हजार १७९ नवे कोरोना रुग्ण आढळले. सध्या यूपीत एकूण सक्रीय रुग्णांची संख्या २ लाख ४५ हजार ७३६ इतकी आहे. तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या गेल्या २४ तासांत २९८ इतकी नोंदवण्यात आली आहे.
आम्ही हतबल ठरतोय; भाजप आमदाराकडून योगी सरकारचे वाभाडे
लोकांचे मृत्यू होत आहेत आणि त्यांचे जीव वाचवण्याची इच्छा असूनही आम्ही काहीच करू शकत नाही, अशा भावना भाजपा आमदार लोकेंद्र प्रताप सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पत्रातून व्यक्त केल्या आहेत. लोकांचे मृत्यू होत आहेत आणि मदत करायची असूनही आम्हाला मदत करता येत नाही, असं सिंह यांनी पत्रात नमूद केलं आहे. कानपूरचे खासदार सत्यदेव पचौरी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना पत्र लिहून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. कोरोनाचा कहर थांबत नाहीए. आम्ही असहायपणे आपल्या माणसांना मरताना बघत आहोत. कोरोनाच्या संकटापासून एकही गाव वाचलेलं नाही, असं सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे. लखीमपूरमध्ये ऑक्सिजनचा खूप मोठा तुटवडा आहे. त्यामुळे कित्येकांचा जीव जातोय. तहसील स्तरावर सामुदायिक आरोग्य केंद्रावर ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे, असं आमदारांनी पत्रात पुढे नमूद केलं आहे.