मुंबई – कोरोना पॉझिटिव्ह आलेले ८५ टक्के रुग्ण निव्वळ विलगीकरणात बरे होऊ शकतात. परंतु त्यासाठी आवश्यक औषधं सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र पॉझिटिव्ह रुग्णांना द्यावयाची साधी औषधेसुद्धा शासकीय रुग्णालये, कोविड सेंटर येथे उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांची परिस्थिती खालावून त्यांना पुढील उपचार देणे गरजेचे ठरते यासाठी औषधं उपलब्ध होण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.
बाळासाहेब थोरातांनी पत्रात लिहिलंय की, अहमदनगर जिल्ह्यात मी नुकताच तालुकानिहाय दौरा केला. स्थानिक पातळीवर जाऊन चर्चा केली. स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यासाठी किमान २४ ते ४८ तासांचा अवधी लागतो. या काळात स्वॅब दिलेल्या रुग्णांचे विलगीकरण केले जात नाही. अनेक तालुक्यांमध्ये रॅपिड अँन्टीजेन टेस्ट किट उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये रुग्णांच्या चाचण्या न झाल्याने रुग्णांच्या संख्येत घट दिसून येते खरे तर वस्तूस्थिती तशी नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच नागरिकांमध्ये लक्षणे दिसल्यानंतर HR CT करण्याकडे नागरिकांचा कल असतो. पर्यायाने स्कॅनिंग सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. ही ठिकाणेसुद्धा रुग्ण वाढीचे कारण ठरत आहे. रुग्णालयात दाखल करताना डॉक्टर या HR CT च्या रिपोर्टचा आग्रह धरतात. याबाबत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय HRCT न करणे आणि आवश्यकता नसताना HRCT करायला न लावणे याबाबत धोरण ठरवणे आवश्यक आहे. अनेक डॉक्टर रुग्णांना आवश्यकता नसतानाही रेमडेसिवीर इंजेक्शनचा आग्रह धरताना दिसतात. याबाबतही राज्यस्तरावर रेमडेसिवीर वापराबाबत स्पष्ट निर्देश वैद्यकीय व्यावसायिकांना देणे आवश्यक आहे असं मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितले आहे.
गेल्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आज ७१ हजार ७३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज किमान ६० हजारांच्या आसपास नविन रुग्णांची नोंद होत आहे. आठवडाभरापूर्वी १८ एप्रिलला आतापर्यंतची सर्वाधिक ६८ हजार ६३१ इतके रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. आठवडाभरानंतर मात्र रुग्णसंख्येत जास्तीची वाढ झालेली आढळून आली नाही मात्र दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. त्याप्रमाणात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, हि दिलासा देणारी बाब ठरली आहे.