मुंबई - एकीकडे कोरोनामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे राज्यात राजकारणही जोरात सुरू आहे. (coronavirus in Maharshtra) एकीकडे लॉकडाऊन, लसीकरण आणि औषध पुरवठ्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असतानाच काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लागू करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या पत्रावरून भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ( ‘‘The state has no policy or direction today; The Congress has also started saying that the government has failed. " BJP Spoke person Keshav Upadhye Criticize Thackeray Government )
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आशिष देशमुखांच्या पत्राचा आधार घेत ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. त्यात उपाध्ये म्हणाले की, राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणिबाणी लागू करा, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस आमदार आशिष देशमुख यांनी पंतप्रधान मोदीना लिहिले आहे. राज्यातले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचे आता कॅाग्रेससुद्धा बोलू लागली आहे. राज्याला ना धोरण ना दिशा ही आजची अवस्था आहे. हे आता आता सत्ताधारीह कबूल करू लागले आहेत, असे केशव उपाध्ये म्हणाले.
दरम्यान, आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणिबाणी लागू करा, अशी मागणी केली होती. या पत्रात ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यामध्ये घटनेतील कलम ३६० अन्वये किमान दोन महिन्यांसाठी आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे, असे आशिष देशमुख यांनी या पत्रात म्हटले आहे.