नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शनिवारी भर दुपारी होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी गर्दी जमविण्याचे मोठे लक्ष्य नगरसेवक व कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे ते घामाघूम झाले आहेत.सामान्यत: प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उमेदवार त्यांच्या समर्थकांना घेऊन शक्तिप्रदर्शन करतात. परंतु यंदा मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी प्रचारसभा ठेवली आहे. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना ते उत्तर देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सभेसाठी गुरुवारी भाजपाची नियोजनाची बैठक घेण्यात आली. यात चक्क दोन लाख नागरिकांना उपस्थित ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक नगरसेवकाला एक हजार नागरिक आणण्याचे लक्ष्य दिले असून, प्रत्येक कार्यकर्त्याला दहा कार्यकर्ते आणायचे आहेत.सध्या नाशिकमध्ये उन्हाळा कडक असून, तापमान ३९ ते ४१ अंशांवर आहे. अशावेळी इतक्या मोठ्या गर्दी सभास्थळी आणणे कठीण असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मोटारींसह अन्य सहकार्याची तयारी पक्षाने दाखविली असली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी मंडप होते, तशी सोय असणार नाही. त्यामुळे नागरिक भर उन्हात कसे काय उभे राहतील, असा प्रश्नच आहे. त्यामुळे गर्दी जमविण्यासाठी कार्यकर्त्यांनाच घाम निघत आहे.नेहमीच कसे शक्य ?पंतप्रधान मोदी यांची सभा भर दुपारी होती, तसेच ती पिंपळगावसारख्या ठिकाणी होती. तरीही कार्यकर्त्यांनी गर्दी जमविली होती. प्रत्येकवेळी भर उन्हात अशी गर्दी जमविणे कसे शक्य आहे? असाही प्रश्न आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी नगरसेवक घामाघूम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 5:15 AM