Priyanka Gandhi on Mahayuti: हरियाणा, जम्मू काश्मीरनंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसत आहे. प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ ट्विट करत महायुती सरकारच्या काळात झालेल्या कामांच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात खोके आणि धोके सरकारने विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केला आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.
रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण आणि नुतनीकरण करण्यात आले. मात्र, लोकार्पणाआधीच छताचा भाग कोसळला. या घटनेचा व्हिडीओ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी शेअर करत महायुती सरकारवर टीका केली.
प्रियंका गांधी महायुती सरकारबद्दल काय म्हणाल्या?
व्हिडीओ शेअर करत प्रियंका गांधी म्हणाल्या, "महाराष्ट्रातील रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे छत उद्घाटन होण्यापूर्वीच कोसळले आहे. तिकडे मुंबई-नाशिक महामार्ग जो पूर्णही झाला नाही, त्यावर ५०० पेक्षा जास्त खड्डे आणि भेंगा पडल्या आहेत."
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवरही भाष्य
"यापूर्वीही सिंधुदुर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उद्घाटन झाल्यानंतर काही महिन्यातच पडला. मुंबईत १८ हजार कोटी रुपये खर्चून बनलेला अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला तडे गेले आहेत", असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
"महाराष्ट्रातील 'खोके आणि धोके' सरकारने जनतेला विकासाच्या नावावर धोका दिला देऊन भरमसाठ भ्रष्टाचार केला आहे. महाराष्ट्रातील जनता लवकरच याचा हिशोब करणार आहे", असे प्रियंका गांधी म्हणाल्या.