देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे २ लाख ४० हजार नवे रुग्ण आढळले, तर ३७४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात आता म्यूकरमायकोसिस अर्थात काळ्या बुरशीच्या आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या आजारावरील औषधांच्या तुटवड्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. याच गोष्टीवरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक बातमी ट्विट केली आहे. त्याचं कॅप्शन राहुल यांनी "एक तो महामारी और उस पर प्रधान अहंकारी", असं दिलं आहे. राहुल यांनी ट्विट केलेल्या बातमीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारवर केलेल्या आरोपांची माहिती देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) गाइडलाइननुसार देशात कोरोना लसींची साठा उपलब्ध नसतानाही केंद्र सरकारनं लसीकरणाची घोषणा केली, असा आरोप सीरमच्या सुरेश जाधव यांनी केल्याची बातमीच राहुल गांधींनी ट्विट केलीय.
राहुल गांधी याआधी देखील लसीच्या तुटवड्यावरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. शनिवारी राहुल गांधी यांनी मोदींच्या कुशासनामुळे देशात घडत असलेल्या अनागोंदीवर भाष्य केलं होतं. "केंद्र सरकारच्या कुशासनामुळे कोरोनासोबतच आता ब्लॅक फंगस रोगाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. लसींचा तुटवडा तर आधीपासूनच आहे. त्यात आता नव्या रोगाची भर पडलीय आणि याचा सामना करण्यासाठी पंतप्रधान लवकरच टाळ्या आणि थाळ्या वाजवायचा कार्यक्रम हाती घेणार आहेत", असा टोला राहुल गांधी यांनी लागवला होता.