मुंबई:भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोलताना खालच्या शब्दात टीका केली होती. काल(दि.7) विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपकडून भरवण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत 'आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का ? त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल', अशी खालच्या पातळीवरची टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी मुंबईत प्रचंड गोंधळ घातला. यानंतर आता नितेश राणेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 'माझे शब्द मागे घेतो’ असे ट्विट राणेंनी केल आहे.
काल आणि परवा राज्याचे पावसाळी अधिवेशन पार पडले. अतिशय वादग्रस्त ठरलेल्या या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. त्या कारवाईचा निषेध म्हणून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवली होती. इथेच भाषण करताना नितेश राणेंनीनी आदित्य ठाकरेंवर ही घणाघाती टीका केली.
काय म्हणाले नितेश राणे?यावेळी भाषण करताना नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे घराणे काढले. आदित्य ठाकरे यांचेच वंशज आहेत का ? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असे आक्षेपार्ह वक्तव्य नितेश राणेंनीनी केले. नितेश यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी मुंबईत प्रचंड राडा केला. नितेश राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा देखील जाळण्यात आला. या सर्व गोंधळानंतर नितेश राणे यांना उपरती झाली आणि त्यांनी आज त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. राणेंनी ट्विट केले की, 'विधानभवनाबाहेर माझ्या कालच्या भाषणामध्ये मी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला होता. तो अनेकांनी चुकीच्या पद्धतीने घेतला. त्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर, मी माझे शब्द परत घेतो', असे ट्विट नितेश राणे यांनी केले.