मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय हे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवार आहेत. या निमित्ताने नेत्यांचे गड सुरक्षित राहतात की त्यांना पहिल्यांदाच सुरूंग लागतो याबाबत उत्सुकता आहे.सुप्रिया सुळे या गेल्यावेळी मोदी लाटेतही ६९,७१९ मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी रासपचे महादेव जानकर यांनी कमळावर निवडणूक लढविली नव्हती. यावेळी त्यांच्या विरोधात भाजपच्या कांचन कुल उमेदवार आहेत. त्यामुळे गेल्यावेळी कमळ नसल्याने आम्ही हरलो असा बहाणा भाजपने केला होता. ते खरे होते हे सिद्ध करण्याची संधी भाजपला यावेळी आहे.बारामती मतदारसंघावर शरद पवार यांचे वर्षानुवर्षे प्रभुत्व आहे आणि संपूर्ण पवार परिवाराने सुप्रिया यांच्या पाठिशी ताकद उभी केली आहे. दुसरीकडे कांचन कुल यांच्या निवडणूक प्रचारावर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेऊन आहेत. सुप्रिया यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांनी विशेषत: काँग्रेसच्या काही नेत्यांना हाताशी धरले आहे.राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगरमध्ये एका विचित्र राजकीय परिस्थितीतून जात आहेत. ते स्वत: काँग्रेसमध्ये आहेत पण मुलासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात भाजपअंतर्गत गिरीश महाजन यांचा उदय झाल्याने आणि मंत्रिपद गेल्यानंतर काहीसे दुर्लक्षित झालेले एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे या रावेरमध्ये दुसऱ्यांदा भाग्य अजमावित आहेत.रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे लढत असून त्यांची लढत शिवसेना आणि काँग्रेसशी आहे. मतदारसंघावरील आपली पकड ढिली झाली नसल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान राणे यांच्यासमोर आहे. पवार, विखे, राणे, खडसे यांची प्रतिष्ठा पुढच्या पिढीच्या निमित्ताने पणाला लागली आहे.
पवार, खडसे, राणे, विखेंच्या पुढच्या पिढीबाबत उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 5:24 AM