चिपळूण – केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानं अडचणीत आले आहे. राज्यभरात नारायण राणेंच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्याविरोधात अटकेची मागणी केली. यातच नाशिकमध्ये राणेंविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू झाली. नाशिक पोलिसांकडून रत्नागिरी पोलिसांना याबाबत माहिती कळवली. त्यानंतर रत्नागिरी पोलीस राणेंच्या अटकेसाठी संगमेश्वरला पोहचले.
याठिकाणी नारायण राणे जेवण असताना त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. इतकचं नाही तर साहेबांचा वाटेत खून करणार आहात असा गंभीर आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला. राणे पुत्र नितेश-निलेश हे दोघंही अटक वॉरंट आणि नोंदी दाखवण्याची मागणी करत आहेत. जोपर्यंत नोंद दाखवत नाही आम्ही उठणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तर राणेंच्या जीवाला धोका आहे. तुम्ही रस्त्यात मारणार आहात, खून करणार आहात असा गंभीर आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे. असं वृत्त टीव्ही ९ने दिलं आहे. संगमेश्वर येथे सुरु असलेल्या गोंधळामुळे नारायण राणे यांचा बीपी वाढलेला आहे. ते डायबिटीजचे रुग्ण आहेत. बीपी वाढल्यानं नारायण राणेंना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागेल त्यानंतर पुढील उपचार केले जातील अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
“...मग पुन्हा कुणी असं धाडस करू नये”; चंद्रकांतदादांचे BJP कार्यकर्त्यांना आदेश
नारायण राणेंची अटक बेकायदेशीर, वकीलांचा दावा
नारायण राणे यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात जे कलम लावण्यात आले आहेत. त्यात ७ वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ७ वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल तर थेट अटक करण्याचा पोलिसांना अधिकार नाही. त्यामुळे नारायण राणे यांना केलेली अटक बेकायदेशीर आहे. त्यामुळे या अटकेविरोधात आम्ही योग्य त्या वेळी योग्य ठिकाणी दादा मागू अशी माहिती नारायण राणेंचे वकील अनिकेत निकम यांनी पुढे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांच्या माध्यमातून वारंवार सांगितलेले आहे की, एखाद्या गुन्ह्यात ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असेल तर भादंवि कलम ४१ (अ) अन्वये नोटीस बजावून नंतर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे. मात्र, थेट अटक करण्याचा अधिकार नाही.त्यामुळे नारायण राणेंची अटक बेकायदेशीर असल्याचं वकील अनिकेत निकम यांनी म्हटलं आहे.
राणेंच्या समर्थनार्थ केंद्रीय नेतृत्व सरसावलं
नारायण राणेंवर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना केलेल्या ट्विटमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणेंची केलेली केली अटक ही घटनात्मक मूल्यांचे हे हनन करणारी आहे. या प्रकारच्या कारवाईमुळे आम्ही ना घाबरणार, ना दबून राहणार. भाजपला जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ही मंडळी त्रस्त आहे. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून लढत राहू, जनआशीर्वाद यात्रा सुरूच राहील, असे जे.पी. नड्डा म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटलांचे BJP कार्यकर्त्यांना आदेश
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा भाजपा प्रखरतेने विरोध करेल. भाजपा कार्यकर्ते राज्यभरात आंदोलन करेल. ही आंदोलनं इतकी तीव्र असतील की पुन्हा कुणी असं धाडस करू नये. नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. परंतु केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा देशातील पहिलाचा प्रसंग आहे. अनैसर्गिक पद्धतीने आलेले सरकार पोलिसांचा गैरवापर करतंय असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी केला आहे.