सिद्धूबाबतच्या त्या निर्णयामुळे वाद अधिकच पेटला, पंजाबमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 09:56 PM2021-07-15T21:56:10+5:302021-07-15T21:56:51+5:30
Punjab Congress News: पंजाबमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सुरू असलेली वर्चस्वाची लढाई थांबण्याचे नाव घेत नाही आहे.
नवी दिल्ली - पंजाबमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सुरू असलेली वर्चस्वाची लढाई थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज पंजाबमधील वाद मिटवण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपद कायम ठेवून नवज्योत सिंग सिद्धूंकडे पंबाज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात येणार असल्याचे वृत्त आले होते. या निर्णयाबाबत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर सिद्धू यांच्या समर्थकांचा गट अधिकच सावध झाला आहे. (That decision about Sidhu further fueled controversy, with the Congress on the verge of splitting in Punjab)
आता नवज्योत सिंग सिद्धूंकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यापूर्वी पंजाब काँग्रेस दोन गटात विभाजित होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. जर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धूंना प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यापासून रोखण्याच्या प्रयत्न केल्यास पुढील रणनीती काय असावी, याबाबत सिद्धूंच्या गटाकडून तयारी केली जात आहे.
चंदिगडमध्ये सिद्धू यांच्यासोबत पाच मंत्री आणि सुमारे १० आमदारांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. चंदिगडमधील सेक्टर ३९ मधील पंजाबचे कॅबिनेट मंत्री आणि कॅप्टनविरोधी गटातील नेते सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या घरी ही बैठक झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या दबावाखाली येत पक्षश्रेष्ठींनी नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद दिले नाही तर अशा परिस्थितीच पुढील रणनीती आखली जात आहे. स्वत: नवज्योत सिंग सिद्धू या बैठकीत सहभागी झाले होते.
दुसरीकडे नवज्योत सिंग सिद्धू यांच्या बैठकीनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही मोहालीमध्यील सिसवां येथील आपल्या फार्म हाऊसवर जवळचे आमदार आणि मंत्री व खासदारांसह आपातकालीन बैठक बोलावली आहे.