मुंबई : आरेमेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलविण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण मेट्रो प्रकल्पाचे आर्थिक गणित कोलमडणार असून प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता संपेल. शिवाय, प्रकल्पाचा खर्च वाढून अखेर त्याची वसुली मुंबईकरांकडून वाढीव तिकीटदराच्या माध्यमातून केली जाईल. महाविकास आघाडी सरकारनेच स्थापन केलेल्या समितीने आरेचीच जागा अधिक पर्यावरणपूरक असल्याचा निष्कर्ष काढला होता, असे सांगत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली.
कारशेड कांजूरला हलविण्याच्या निर्णयामुळे चार-पाच वर्षे कारडेपोच नसेल. त्यामुळे प्रकल्पाचे काम असून नसल्यासारखे असेल, असे फडणवीस यांनी आज टिष्ट्वटरवरून म्हटले. कारशेडची जागा बदलून सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला. प्रकल्पाला आणखी विलंब करण्यामुळे कार्बनचे उत्सर्जन वाढून पर्यावरणाची अधिक हानी होईल. त्यामुळे वृक्षतोडीच्या परिणामांपेक्षा आरेचीच जागा अधिक पर्यावरणपूरक आहे, असा निष्कर्ष खुद्द महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या समितीनेच काढला. २०१५ साली कांजूरमार्गच्या जागेचा विचार केला होता. या जागेवरून न्यायालयात दावे सुरू असल्याने विचार सोडावा लागला, असे सांगत यासंदर्भातील कागदपत्रेच फडणवीस यांनी उघड केली.पर्यावरणवादी समर्थन करणार का?कांजूरमार्गच्या जागेवरही पर्यावरणाची हानी, जैवविविधेला धोका आणि जनतेची प्रचंड गैरसोय असे अनेक प्रश्न निर्माण होतील. आरे कारशेडची जागा कोणताच अन्य पर्याय शिल्लक न राहिल्याने निश्चित केली होती. आता पर्यावरणवादी मंडळी मिठागाराच्या जागेवर, कांदळवन असलेल्या जागेवर, वन संरक्षित जागेवर कारशेडचे समर्थन करणार का, असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.