नाशिक : महाआघाडीत अंतर्गत कोणतेही पक्षांतर करण्यापूर्वी संबंधित पक्षांतील पक्षश्रेष्ठींची संमती अत्यावश्यक आहे; परंतु राज्यातील अन्य पक्षांमधील बरेच नेते राष्ट्रवादीत यायला इच्छुक असले तरी त्याबाबत आताच काही सांगता येणार नसल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बाळासाहेब सानप यांच्यासारखे अनेक जण राष्ट्रवादीत यायला इच्छुक असले तरी महाआघाडीतील पक्षांतराबाबतचा निर्णय हे संबंधित पक्षांचे पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत. पक्षांतराबाबत अनेकांच्या भेटीगाठी होत असतात, अन्य पक्षांमधील नेते, पदाधिकारीदेखील राष्ट्रवादीत यायला इच्छुक आहेत; मात्र त्याबाबत आताच काही बोलणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले. नाशिक महानगरपालिका निवडणूक महाआघाडीने एकत्रित लढवायची की कसे, त्याबाबतचा निर्णय झालेला नसल्याचे ते म्हणाले.
नाराज हा माध्यमांचा शब्दराज्यातील सरकारवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी नाराज आहेत, या चर्चेत तथ्य नाही. नाराजी हा माध्यमांनी पसरवलेला शब्द आहे. मागासवर्गीय, अल्पसंख्याक, गोरगरिबांना न्याय द्यावा, हे कॉंग्रेसचे पूर्वीपासूनचे धोरण आहे. त्यामुळे या ध्येयधोरणाकडे लक्ष द्यावे, असे सांगण्यात काही वावगे नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्षदेखील मुख्यमंत्र्यांना भेटतात तेव्हा काही विशेष प्रश्न किंवा निर्णय असतील तर त्यावर चर्चा, सल्लामसलत करतात, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नमूद केले.
प्रत्येक पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना सर्व जागा लढवा, असे सांगत असले तरी त्यात काही चुकीचे नाही. कदाचित नाशिक मनपाची निवडणूक महाआघाडी एकत्रित लढवेल किंवा सर्व पक्ष स्वतंत्र लढून निवडणुकीनंतरही एकत्रित येऊ शकतील. - छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री