Deepak Aaba Salunkhe sangola vidhan sabha 2024: सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठरला आहे. दीपक आबा साळुंखे ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढणार हे निश्चित झाले असून, तसे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. आम्ही आजपासून कामाला लागणार असल्याचे दीपक साळुंखे यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केल्यानंतर सांगितले.
दीपक साळुंखे विरुद्ध शहाजीबापू पाटील
संजय राऊत म्हणाले, "सांगोल्याच्या गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून विजयी होण्याच्या मार्गावर असलेले आपल्या सगळ्यांचे दीपक आबा. महाराष्ट्राच्या राजकारणातील आज महत्त्वाचा दिवस आहे. ज्या एका गद्दाराला महाराष्ट्रातील झाडे, डोंगर दिसले नाही आणि दुसऱ्या राज्यात जाऊन झाडे, डोंगर पाहत बसला. आता त्या झाडाच्या मूळाखाली आपल्याला त्याला गाडायचं आहे. योग्य व्यक्ती आपल्या पक्षात हाती मशाल घेऊन आज उभी आहे", असे सांगत संजय राऊतांनी दीपक साळुंखे यांची उमेदवारी अप्रत्यक्षपणे जाहीर केली.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "आबांनी शिवसेना पक्षप्रमुखांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला खात्री आहे की, सांगोल्याच्या मतदारांना ज्या निर्णयाचा गर्व वाटेल, अशा प्रकारचा निर्णय भविष्यात उद्धव ठाकरे घेतली आणि आमदार म्हणून ते विजयी होतील. त्या गद्दाराला गाडण्यासाठी घराघरामध्ये आपली मशाल पोहोचवायला पाहिजे. हे ठामपणे निश्चय करा."
दीपक आबा साळुंखेंच्या हातात मशाल दिलीये -उद्धव ठाकरे
ठाकरे काय म्हणाले, "आबा तुमच्या हातात मशाल दिलीये. मशाल कशी पेटवायची आणि कोणाला चटके द्यायचे हे तुम्ही ठरवायचं आहे. निवडणूक सोप्पी नाहीये. दीपक आंबा आले आहे म्हणजे विजय नक्की आहे. तुम्ही घराघरात मशाल पोहोचवली पाहिजे. आपण अजून कुणाची उमेदवारी आपण जाहीर केलेली नाही, फक्त दीपक आबांच्या हातात मशाल दिलेली आहे", असे सांगत ठाकरेंनी त्यांच्या उमेदवारीबद्दल भाष्य केले.
दीपक आबा साळुंखे म्हणाले, "महाविकास आघाडीमध्ये ही (सांगोला) जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे आणि उद्धव साहेबांनी मला सांगितलं आहे की, आमची मशाल तुमच्या हातामध्ये दिलेली आहे. त्यामुळे आम्ही आजपासून कामाला लागू", असे म्हणत दीपक साळुंखे यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून प्रचाराला सुरूवात करणार असल्याचे स्पष्ट केले.