नवी दिल्ली : दिल्ली काँग्रेस कमिटीने रविवारी राहुल गांधी यांची तत्काळ काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करावी, असा ठराव मंजूर केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कांग्रेस पार्टीने जून २०२१ पर्यंत पार्टीच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात येईल, असे सांगितले होते.
काँग्रेस कार्यकारिणी समितीने विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका घेण्याला मंजुरी दिली होती. तसेच, काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पार्टीच्या स्थायी अध्यक्षासह संघटनात्मक निवडणुका घेण्याबाबत सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. यामध्ये गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भुपिंदर हुडा, पृथ्वीराज चव्हाण, कपिल सिब्बल, मनिष तिवारी आणि मुकुल वासनिक यांचा समावेश होता.
दरम्यान, यानंतर सोनिया गांधी यांनी गेल्या महिन्यांत या पत्र लिहिणाऱ्या काही नेत्यांची बैठक घेऊन त्यांनी उपस्थित केलेल्या काँग्रेस पक्षातील अंतर्गत स्थितीबाबत चर्चा केली होती. तसेच, शेतकरी आंदोलन, महागाई अशा अनेक विषयांवर चर्चा केल्याचे समजते.