नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाणा बनवला आहे. यातच सत्ताधारी भाजपा पक्षाच्या आमदारांच्या वादग्रस्त विधानामुळे सरकारची आणखी कोंडी होत असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री अजित पाल यांनी हाथरस घटना छोटा मुद्दा असल्याचं म्हटलं होतं, त्यानंतर आता भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनीही वादग्रस्त विधान केले आहे.
हाथरस घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहे. ज्याठिकाणी विरोधी पक्ष पीडित कुटुंबाची भेट घेत आहे तर दुसऱ्याठिकाणी या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षाचे नेते विरोधकांवर राजकारणाचा आरोप लावत आहेत.भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांच्या विधानानंतर दिल्लीमहिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा आमदाराचे विचार अत्यंत खराब आहेत. बलात्कार रोखण्यासाठी योगी सरकारचे आमदार म्हणतात मुलींना संस्कार द्यावे. अशा विचारसरणीच्या लोकांवर पदावर बसवलं आहे. त्यामुळेच यूपीत मुलींवर अत्याचार होत आहेत. त्या माणसाला जाऊन विचारा, ३ महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार होतो ती असंस्कारी असते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले होते भाजपा आमदार सुरेंद्र सिंह?
सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. "आपल्या मुलींना संस्कारी वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात. अशा घटनांना शासन आणि तलवारी रोखू शकत नाहीत" असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये रामराज्याचा दावा केला जात असताना बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. यामागचं कारण काय? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
या घटना केवळ चांगल्या संस्कारांनीच रोखल्या जाऊ शकतात"
"मी आमदारासोबतच एक शिक्षकही आहे. या घटना केवळ चांगल्या संस्कारांनीच रोखल्या जाऊ शकतात. शासन आणि तलवार त्यांना रोखू शकत नाही. आपल्या मुलींवर संस्कार करणं हा सर्वांचा धर्म आहे. माझा धर्म आहे, सरकारचा धर्म आहे. कुटुंबाचाही हा धर्म आहे. जिथे सरकारचा धर्म संरक्षण करण्याचा आहे. तिथे मुलांना संस्कार देणं हा कुटुंबांचा धर्म आहे. सरकार आणि संस्कार मिळून देशाला सुंदर रुप देऊ शकतात. त्यासाठी दुसरं कोणीही समोर येणार नाही" असंही देखील भाजपाच्या आमदाराने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
‘हाथरस’चा तपास सीबीआयकडे; योगी सरकारची घोषणा
उत्तर प्रदेश पोलिसांवर अथवा सीबीआयवर आमचा विश्वास नसून, आमच्या मुलीवर झालेला बलात्कार आणि तिचा मृत्यू यांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी शनिवारी केली. त्यानंतर काही मिनिटांतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात येत असल्याची घोषणा केली. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी कधीही सीबीआय चौकशीची मागणी केली नव्हती. किंबहुना आम्हाला सीबीआय तपास नको, आमचा त्या यंत्रणेवर विश्वास नाही, असे कुटुंबातील प्रत्येक जण सांगत होता. तरीही सरकारने तपास सीबीआयकडे सोपविला आहे.