मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २०२२च्या निबडणुका स्वबळावर लढवाव्यात आणि शक्य असेल तेथे जागा सामायिक करण्यासाठी समविचारी लहान पक्षांना घ्यावे, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.
२०२२च्या पालिका निवडणुकीच्या तयारीबाबत दादरच्या टिळक भवन येथे काल काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, काँग्रेसचे विद्यमान आमदार, माजी आमदार, माजी एमआरसीसी प्रमुख, युवा अध्यक्ष, महिला व विद्यार्थी संघटनांचे अध्यक्ष, राष्ट्रीय पदाधिकारी, नगरसेवक आणि नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांची मतेसुद्धा जाणून घेतली.
येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टी यांची गुप्त बोलणी सुरू आहेत, तर भाजप व मनसे युती होण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसमध्ये अजून अध्यक्ष जर ठरत नसेल तर कार्यकर्ते कामाला कधी व कसे लागणार याबाबत ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
२०१७च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे २९ नगरसेवक निवडून आले होते. सध्याच्या परिस्थितीत दहासुद्धा नगरसेवक निवडून येणे कठीण आहे, असे मत काँग्रेसच्या माजी मंत्र्याने व्यक्त केले. तर कमी पैशात पालिकेची निवडणूक लढायची असेल तर लवकरात लवकर उमेदवार निश्चित करावे लागतील, जेणेकरून ते स्वतःच्या ताकदीने निवडणुकीच्या कामाला लागतील असे मतही व्यक्त केले.