मुंबई : नेतृत्वाच्या मुद्दयावरून काँग्रेसमध्ये घमासान सुरू झाले आहे. पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी नेतृत्व देण्याची पत्राद्वारे मागणी करणारे २३ ज्येष्ठ नेत्यांवर आता पक्षातून टीका होऊ लागली आहे. काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री सुनिल केदार यांनी तर थेट पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्यावर उघडपणे टीकेची झोड उठवली आहे. गांधी कुटुंबियांच्या प्रश्न उपस्थित करणाऱ्या या नेत्यांना लाज वाटायला हवी, अशी बोचरी टीका केदार यांनी केली आहे.
काँग्रेस नेतृत्वात बदलाच्या मागणीसाठी २३ नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठविले होते.यात महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा या तीन नेत्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर केदार यांनी, गांधी कुटुंबियांवर प्रश्न उपस्थित करणार्यांना पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी या कृत्याबद्दल तात्काळ माफी मागावी, अशी मागणी टि्वटरद्वारे केली. माफी मागितली नाही तर हे तीन नेते राज्यात कसे फिरतात ते काँग्रेसचे कार्यकर्ते बघून घेतील. गांधी घराण्याचे नेतृत्व असेल तरच काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकतो. सोनिया गांधी यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे, असेही सुनिल केदार यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.