नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी आज मतदान होणार असून विरोधकांनी संख्याबळ नसतानाही उमेदवार दिला आहे. या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांची एकजुट पहायला मिळणार आहे. सत्ताधारी भाजपतर्फे जदयूचे राज्यसभा सदस्य हरिवंश नारायण सिंह तर विरोधकांकडून काँग्रेसचे बीके हरिप्रसाद मैदानात उतरले आहेत. आज दुपारी 12 वाजता मतदान प्रक्रिया सुरु होणार आहे. गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. यावेळी दोनही बाजुंकडील काही घटक पक्षांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर राज्यसभेतही हे पक्ष अनुपस्थित राहतील की मते फुटतील याची उत्सुकता दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधांनीही आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, संख्याबळ पाहता हरिवंश सिंह याची निवड पक्की मानली जात आहे. बुधवारी विरोधकांपैकी एक पक्ष असलेल्या बीजेडीने भाजपप्रणित उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने विरोधकांना मोठा झटका बसला आहे. त्यातच आपच्या खासदारांनीही राहुल गांधी स्वत: केजरीवाल यांच्याशी बोलल्यास काँग्रेसच्या उमेदवाराला मत देऊ, अशी अट ठेवली आहे. तसेच भाजपवर नाराज असलेल्या शिवसेनेनेही हरिवंश यांना पाठिंबा दिला आहे. महत्वाचे म्हणजे शिवसेनाच अनुमोदकाच्या भुमिकेत आहे.
कोण राहणार अनुपस्थित? हरिवंश सिंह यांना मतदान करण्यासाठी जेडीयूच्या नितिश कुमार यांनी आपच्या केजरीवाल यांना फोन केला होता. मात्र, त्यांचा उमेदवार भाजपच्या पाठिंब्यावर उभा असल्याने केजरीवाल यांनी नकार दिला आहे. तसेच आपने काँग्रेसला घातलेली अट मान्य न झाल्यास आपसमोर अनुपिस्थत राहण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. याचबरोबर वायएसआर काँग्रेसचे 2, पीडीपी 2, डीएमकेचे 1 सदस्य अनुपस्थित राहू शकतात. यामुळे विजयासाठी लागणारे संख्याबळ कमी होईल.
कोणाकडे किती संख्याबळ? एनडीएचे 91 सदस्य, तीन स्वीकृत सदस्य, अमर सिंह, अन्नाद्रमुकचे 13, टीआरएसचे 6, आयएनएलडीचा एक असे मिळून 115 मते हरिवंश सिंह यांना पडण्याची शक्यता आहे. तर बीजेडीकडे 9 मते आहेत. नवीन पटनायक यांनीही समथर्न दिले आहे. वायएसआर काँग्रेसने समथर्न दिल्यास भाजपच्या उमेदवाराला 126 मते मिळू शकतात. तर युपीएकडे काँग्रेसची 61 मते, तृणमूल आणि सपचे प्रत्येकी 13, टीडीपी 6, सीपीएम 5, बसप आणि डीएमकेचे प्रत्येकी 4, सीपीआयचे 2 आणि जेडीएसचे 1 असे संख्याबळ आहे. यामध्ये अपक्ष आणि स्वीकृत सदस्य मिळून हे संख्याबळ 111 होणार आहे.राज्यसभेमध्ये 244 सदस्य असतात. यामुळे विजयासाठी 123 मते आवश्यक आहेत.