मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम एमएमआरडीएने अचानक रद्द केला. इंदू मिल येथील राष्ट्रीय स्मारकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पायाभरणीचा कार्यक्रम होणार होता. मात्र निमंत्रणावरुन झालेल्या वादातून हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. पण ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाल्याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसला.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी अजितदादा पुण्याहून मुंबईसाठी येत होते. दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार होता. मात्र अचानक हा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती MMRDA ने दिली. त्यामुळे वाशीपर्यंत पोहचलेले अजित पवार पुन्हा यु-टर्न घेत पुण्याच्या दिशेने रवाना झाले. आज सकाळी ६ वाजता अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर मेट्रो अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर कोविड १९ बाबत अधिकाऱ्यांची बैठक अजितदादांनी घेतली.
पुणे विधानभवन सभागृहात आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रातील 'कोरोना' परिस्थिती आणि उपाययोजनांबाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे हे उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम रद्द; निमंत्रणाच्या वादावरुन झाला गोंधळ
मुंबई येथील इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमाला केवळ १६ जणांनाच आमंत्रण दिले गेले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अधिकारी हे उपस्थित राहणार होते.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, स्मारक पुतळा पायाभरणी कार्यक्रमाचे अद्याप निमंत्रण मिळालेले नाही. मात्र कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण माझी उद्धव ठाकरेंना विनंती आहे की त्यांनी अटलबिहारी वाजपेयींची इंदू मिलच्या जागेबाबत जी नोट आहे तिचे प्रथम अध्ययन करावे. तसेच वाजपेयींना नेमके काय अपेक्षित होतं ते ठाकरेंनी बघावे आणि त्यासाठी पुढाकार घ्यावा. स्मारकाच्या आराखड्याबाबत सुरूवातीपासूनच माझा आक्षेप आहे. तरीही मला कोणावर ही आरोप करायचे नाहीत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला अशा कार्यक्रमांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. इंदू मिल येथील स्मारकाला माझा विरोध कायम आहे अन् हे मी तिथे जाऊन बोलेल असेही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
राजकारण करू नये मुख्यमंत्र्यांचे आवाहन
इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे