मुंबई - राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. (Ajit Pawar birthday ) कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, गर्दी जमवू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा डिजिटल स्वरुपात व्यक्त कराव्यात. सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याच्या लढाईत योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar's decision not to celebrate birthday on the backdrop of Corona)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा येत्या गुरुवारी, दि. 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, हितचिंतक, नागरिकांची होणारी गर्दी व त्यामुळे वाढणारा कोरोनाचा धोका टाळण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते व हितचिंतकांनीही गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करता त्यासाठी खर्च होणारा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसारख्या कोविडविरोधी लढ्यासाठी द्यावा. मान्यताप्राप्त यंत्रणांच्या सहकार्याने, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन रक्तदान शिबिरांसारखे लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.