एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल अजित पवारांची थेट प्रतिक्रिया; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 01:10 PM2020-10-16T13:10:43+5:302020-10-16T13:20:30+5:30
राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले...
पुणे : गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांना अगोदर विधान परिषदेची उमेदवारी देऊन नंतर मंत्रिमंडळातील महत्वाचे खाते देण्यात येणार असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळेबेरे समजू नये. तसेच एकनाथ खडसे यांच्या प्रवेश बद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुण्यात विधानभवन या ठिकाणी विविध प्रश्नांच्या संदर्भातील आढावा बैठकांचे निमित्ताने अजित पवार आले होते. त्या दरम्यान ते पत्रकारांशी बोलले. यावेळी बोलताना ते म्हणाले अतिवृष्टी ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ठरावीक निकषापेक्षा जास्त मदत द्यावी लागणार,त्यासाठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार आहे.
आयएमडी अंदाज खरा ठरला,सर्व मदत दिली जाईल,पंढरपूर घटनेचा सदोष मनुष्यवद गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.पावसाबाबत महापालिकेने काम करायला हवं होतं,आता त्याची बैठक घेतोय,वॉल का बांधली नाही काम का झालं नाही,.याबाबत बैठक घेतोय,शहर कुठलही असो काम झालं पाहिजे, पुण्यातील पूरस्थितीला महापालिका जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही पंचनामे करत आहोत,त्याला काही केंद्राचे नियम आहेत. त्यामुळे यात बाधित लोकांना मदत आधार राज्य सरकार देईलच. पण केंद्रानेही मदत केली पाहिजे. साखर कारखाने दहा दिवस उशिरा सुरू होत आहेत. याचबरोबर जलयुक्त शिवार कॅग अहवालानुसार चौकशी सुरू आहे. त्याच्याच काळात अहवाल आला होता. त्याचेच जलसंधारण मंत्री तानाजी सावंत हेच त्यावेळी मंत्री होते.